esakal | विजेतेपदाचे श्रेय चाहत्यांना - विराट कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

केप टाउन - कसोटी क्रिकेटमधील अजिंक्‍यपदचा करंडक सुनील गावसकर (डावीकडे) आणि ग्रॅमी पोलॉक (उजवीकडे) यांच्या हस्ते स्वीकारताना भारताचा कर्णधार विराट कोहली.

विजेतेपदाचे श्रेय चाहत्यांना - विराट कोहली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

डर्बन - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुहेरी यश मिळवलेल्या भारतीय क्रिकेट संघास जागतिक कसोटी विजेतेपदाचा चांदीचा करंडक (गदा) देण्यात आला. त्यामुळे भारताचा ट्‌वेंटी-२०मधील विजयाचा आनंद द्विगुणित झाला. या जागतिक कसोटी वर्चस्वाचे श्रेय भारतीय कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांना दिले.

सलग दुसऱ्या वर्षी कसोटी विजेतेपदाची गदा जिंकली आहे. ही आम्हा संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफसाठी स्पेशल कामगिरीच आहे. या यशाकरिता मी भारतीय क्रिकेट संघास सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या चाहत्यांचा आभारी आहे. त्यांनी सातत्याने मोठ्या संख्येने मैदानावर येत आम्हाला प्रोत्साहन दिले; तसेच प्रतिकूल परिस्थितीतही साथ दिली, असे कोहलीने सांगितले.

कोहलीला चांदीची गदा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये असलेल्या सुनील गावसकर आणि ग्रॅमी पोलॉक यांनी दिली. याचबरोबर संघाला १० लाख डॉलरचे रोख बक्षीसही देण्यात आले. भारताने जोहान्सबर्गमधील कसोटी जिंकून अग्रस्थान पक्के केले होते. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत ऑक्‍टोबर २०१६ पासून अव्वल आहे. 

कठोर परिश्रमामुळेच आम्हाला यश मिळाले आहे. आता हेच यश कायम राखण्यासाठीही आम्ही कठोर मेहनत घेणार आहोत. चाहत्यांना खेळाचा पुरेपूर आनंद देतानाच भारतीय क्रिकेट संघास सातत्याने उच्च स्थानावर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही भारतीय कर्णधाराने सांगितले. तो पुढे म्हणाला, हे यश चाहते तसेच संघ एकमेकांच्या साथीत असल्यामुळेच मिळवता आले आहे. आगामी एखाद दीड वर्षात भारतीय संघाच्या खडतर मालिका आहेत. या लढती आम्ही देशाबाहेर खेळणार आहोत, त्या वेळी तुमच्या प्रोत्साहनाची, पाठबळाची आम्हाला गरज आहे. सातत्याने प्रोत्साहित केल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. भविष्यातही स्टेडियममध्ये येऊन साथ द्याल ही अपेक्षा आहे, असे त्याने सांगितले.

loading image