
SL vs AFG : 'चेस' करण्यात लंकेचा डंका; अफगाणचे फिरकी आव्हान लावले परतवून
Asia Cup 2022 Sri Lanka Vs Afghanistan : आशिया कपच्या सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर 176 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान श्रीलंकेने 19.1 षटकात पार केले. लंकेने ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशविरूद्ध 183 धावा चेस केल्या होत्या. आता अफगाणिस्तानविरूद्ध त्यांनी 176 धावां चेस करून दाखवल्या.
श्रीलंकेकडून कुसल मेंडीस (36) आणि पथुम निसंका (35) यांनी दमदार सुरूवात केली. त्यानंतर दनुष्का गुणतिलका ( 20 चेंडूत 33 धावा), भानुका राजपक्षे (14 चेंडूत नाबाद 31 धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करत श्रीलंकेला विजयी मार्गावर नेले. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमानने 2 विकेट घेतल्या.
श्रीलंकेचे सलामीवीर कुसल मेंडीस (36) आणि पथुम निसंका (35) यांनी 6.3 षटकात 63 धावांची सलामी दिली. या आक्रमक सुरूवातीनंतर अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने ही जोडी फोडली. त्यानंतर निसंका देखील मुजीबची शिकार झाला. असलंका 8 आणि दसुन शनका 10 धावांची भर घालून माघारी परतले.
लंकेची अवस्था 4 बाद 119 धावा अशी झाली असताना त्यानंतर दनुष्का गुणतिलका ( 20 चेंडूत 33 धावा), भानुका राजपक्षे (14 चेंडूत नाबाद 31 धावा) यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरूवात केली. त्यांनी सामना बॉल टू रन आणला. गुणतिलका शेवटची काही षटकेत राहिली असताना बाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या वानिंदू हसरंगाने 9 चेंडूत 16 धावा चोपून सामना संपवला.
दरम्यान, श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सलामीवीर रेहमानुल्ला गुरबाजने कडक बॅटिंग करत लंकेचा हा निर्णय फोल ठरवला. त्याने 45 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. गुरबाजची ही 84 धावांची खेळी आशिया कपमधील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी केली. या खेळीच्या जोरावर अफगाणिस्ताने 20 षटकात 6 बाद 175 धावांपर्यंत मजल मारली होती.