esakal | SL vs IND : टीम इंडियाने मालिका गमावली, 21 प्रयत्नानंतर लंकेला यश
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Lanka vs India

SL vs IND : टीम इंडियाने मालिका गमावली, 21 प्रयत्नानंतर लंकेला यश

sakal_logo
By
सुशांत जाधव

घरच्या मैदानात वनडे मालिका गमावलेल्या श्रीलंका संघाने टी-20 मालिकेतील निर्णायक सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाने दिलेल्या अल्प धावांचे आव्हान श्रीलंकने 7 गडी आणि 33 चेंडू राखून पार केले. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या भारतीय संघाला अवघ्या 81 धावात रोखून श्रीलंकेने निम्मा सामना पहिल्या डावातच जिंकला. उर्वरित कसर त्यांनी बॅटिंगवेळी पूर्ण केली. अविष्का फर्नांडो 12 (18), भानूका 18 (27) आणि समरविक्रमा 6 (13) धावा करुन बाद झाल्यानंतर धनंजया डी सिल्वा 20 चेंडूत नाबाद 23 आणि हसरंगाने 9 चेंडूत 14 धावा करत संघाला सहज विजय मिळवून दिला. ऑगस्ट 2008 पासून आतापर्यंतच्या जवळपास 21 प्रयत्नानंतर श्रीलंकेला भारताविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकण्यात यश मिळाले आहे. (Sri Lanka vs India 3rd T20I Series First bilateral series win in 21 attempts for Sri Lanka against India)

शिखर धवनने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय श्रीलंकन गोलंदाजांनी व्यर्थ ठरवला. हसरंगाने 4 कर्णधार शनाकाने 2 आणि मंडिस-चेमीरा या दोघांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत भारतीय संघाला अडचणीत आणले. कुलदीप यादव 23* भुवनेश्वर 16 आणि ऋतूराजने केलेल्या 14 धावा वगळता अन्य एकाही खेळाडूला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी भारतीय संघाला पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 81 धावांपर्यंतच मजल मारता आली. हे आव्हान श्रीलंकेनं सहज परतवून लावत सामन्यासह टी-20 मालिका 2-1 अशी खिशात घातली.

पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला होता. क्रुणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 9 जणांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली. या परिस्थितीत भारताच्या बॅटिंग ऑर्डरची गणिते बिघडली. पर्यायी संघ बेस्ट आहे, असा विश्वास राहुल द्रविडने वर्तवला होता. नव्या गड्यांच्या साथीनं धवनला टी-20 मालिका जिंकता आली नाही.

loading image
go to top