डेव्हिस करंडक : दुबळ्या पाकिस्तानपुढे तगड्या भारताचे आव्हान

Davis-Cup-Team-India
Davis-Cup-Team-India

नूर सुलतान (कझाकिस्तान) : केंद्रावरून गेले काही महिने चर्चेत असलेली भारत-पाकिस्तान डेव्हिस करंडक लढत उद्या शुक्रवारपासून (ता.28) येथे सुरू होत आहे. प्रतिस्पर्धी दुबळा असल्याने भारताचे वर्चस्व राहणार यात शंकाच नाही. पण, त्याहीपेक्षा संधीचा फायदा घेऊन कामगिरी उंचावण्याकडे भारतीय संघाचा कल राहणार आहे. 

या लढतीत भारताकडून सुमीत नागल, रामकुमार रामनाथन एकेरीत, तर जीवन नेंदुचेळीयन आणि लिअँडर पेस दुहेरीत खेळणार आहेत. जीवन या लढतीद्वारे डेव्हिस करंडक स्पर्धेत पदार्पण करणार आहे. पाकिस्तानकडून मुहंमद शोएब, हुझाईफा अब्दुल रहमान हेच दोघे एकेरी आणि दुहेरीची देखील लढत खेळणार आहेत. 

पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणावरून ही लढत चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानला या लढतीचे यजमानपद गमवावे लागले आणि लढत त्रयस्थ केंद्रावर कझाकिस्तान येथे खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला पाकिस्तानने आव्हान दिले होते. मात्र, ते फेटाळून लावण्यात आले आणि या निषेधार्थ त्यांच्या एसाम उल हक कुरेशी आणि अकिल या प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली. त्यामुळे त्यांची अर्धी ताकद तेथेच संपली आहे. त्यांचे दोन्ही खेळाडू कुमार गटाचे म्हणजे 16 वर्षांचे असून, त्यांचे पदार्पण असेल.

अर्थात या खेळाडूंना लगेच कमी लेखता येणार नाही. त्यांच्याशी प्रथमच सामना होणार असल्यामुळे भारतीय संघ कुठलाही धोका पत्करायला तयार नाही. संघाच्या तयारीबाबत संघ व्यवस्थापक सुंदर अय्यर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे मान्य केले.

ते म्हणाले, "प्रतिस्पर्धी कधीच दुबळा नसतो. आम्हीदेखील पाकिस्तानला दुबळे मानत नाही. पण, ते अननुभवी आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फारसा अनुभव नाही हे लक्षात घेतले, तर त्यांच्याविरुद्ध दया माया न दाखवता खेळ उंचावण्याचा आमचा कल राहील आणि विक्रमी विजय मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.'' 

भारतीय संघाच्या रचनेबद्दल बोलताना अय्यर म्हणाले, ''रामकुमार, सुमीत एकेरीत खेळणार आहेत. पेसच्या साथीत जीवन पदार्पण करेल. संघ तगडा आहे, म्हणूनच मोठा विजय डोळ्यासमोर ठेवूनच खेळाडू कोर्टवर उतरतील. हा विजय आपल्याला जागतिक गटात घेऊन जाणार आहे आणि तेथे आपली गाठ क्रोएशियाशी पडणार आहे. त्यासाठी या लढतीमधील कामगिरी महत्त्वाची ठरेल.'' 

भारतीय संघात प्रमुख खेळाडू नाहीत असे म्हणता येणार नाही. प्रज्ञेश, रोहन आणि दिवीज हे तिघेच या संघात नाहीत. पण, त्यामुळे आपल्या दुसऱ्या फळीच्या खेळाडूंना चांगली संधी मिळाली आहे. या लढतीतून आपल्या दुसऱ्या फळीची ताकद दिसून येईल आणि ती सक्षम असल्याची खात्री पटेल. प्रज्ञेश, रोहन, दिवीजचा समावेश झाल्यावर संघ भक्कम होईल यात शंका नाही.

जागतिक गटात त्यांना संधी मिळेल. पण, तेथे जाण्यासाठी ही लढत जिंकावी लागेल आणि त्यासाठी या दुसऱ्या फळीवर मोठी जबाबदारी आहे. अनुभवी पेस या खेळाडूंच्या बरोबर राहात असल्याने त्यांचा विश्‍वास दुणावला आहे. त्यामुळेच हा विजय भारताचे टेनिस सुरक्षित हातात असल्याचे सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

अशा होतील लढती 
दिवस पहिला (ता. 29) एकेरी : 
- रामकुमार रामनाथन वि. मुहंमद शोएब 
- सुमित नागल वि. हुझाईफा अब्दुल रेहमान 

दिवस दुसरा (ता. 30) दुहेरी : 
- जीवन नेंदुचेळीयनलिअँडर पेस वि. हुझाईफा रेहमान-मुहंमद शोएब 
- एकेरी : सुमित नागल वि. मुहंमद शोएब 
- रामकुमार रामनाथन वि. हुझाईफा रेहमान 

सामन्याची वेळ : 
शुक्रवारी : दु. 1.30 पासून, शनिवारी : दु. 11.30 पासून. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com