esakal | अझलनशाह हॉकी: ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत
sakal

बोलून बातमी शोधा

hockey

श्रीजेश हा दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडल्यामुळे त्याच्याऐवजी अननुभवी आकाश चिकटे यास पर्यायी गोलरक्षक म्हणून मैदानात उतरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ही संधी देत सामन्याच्या विशेषत: दुसऱ्या भागात अत्यंत आक्रमक खेळ करत भारतापासून विजय अक्षरश: हिरावून घेतला

अझलनशाह हॉकी: ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत

sakal_logo
By
वृत्तसंस्था

इपोह - मलेशियामधील सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाने आज (मंगळवार) भारतास 3-1 असे पराभूत केले.

या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात 13 व्या मिनिटास गोलरक्षक पी आर श्रीजेश याला गमाविणे भारतासाठी धोकादायक ठरले. श्रीजेश हा दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर पडल्यामुळे त्याच्याऐवजी अननुभवी आकाश चिकटे यास पर्यायी गोलरक्षक म्हणून मैदानात उतरविण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ही संधी देत सामन्याच्या विशेषत: दुसऱ्या भागात अत्यंत आक्रमक खेळ करत भारतापासून विजय अक्षरश: हिरावून घेतला. या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेऊनही अखेर भारतास पराभवच स्वीकारावा लागला.

हरमनप्रीत सिंग याने सामन्याच्या 25 व्या मिनिटास गोल करत भारतास आघाडी मिळवून दिली होती. मात्र मध्यंतरास अवघे 40 सेकंद शिल्लक असताना एडी ओकेनडेन याने गोल करत ऑस्ट्रेलियास बरोबरी साधून दिली. मध्यंतरानंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठवित ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेग याने चिकटे याच्या दोन पायांमधून गोल मारत ऑस्ट्रेलियास 2-1 अशा आघाडीवर नेले. यानंतर काही मिनिटांमध्येच 201 वा सामना खेळत असलेल्या एस व्ही सुनील याला पंचांनी पिवळे कार्ड मिळाल्यामुळे भारतीय संघास उर्वरित सामन्यात 10 खेळाडूंसहच खेळावे लागले.

ऑस्ट्रेलियास आघाडी मिळाल्यानंतर दडपणाखाली आलेल्या भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऑस्ट्रेलियाने भक्कम बचाव करत भारतीय खेळाडूंस गोल करण्याची संधी मिळू दिली नाही. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठविण्यातही भारतीय संघ अपयशी ठरला. सामन्याच्या 51 व्या मिनिटांत टॉम विकहॅम याने ऑस्ट्रेलियासाठी गोल करत विजय निश्‍चित केला.

या स्पर्धेमध्ये भारताने न्युझीलंडविरोधात 3-0 असा विजय मिळविला आहे. याचबरोबर भारताची ब्रिटनबरोबरील लढत 2-2 अशी बरोबरीत सुटली आहे. या स्पर्धेच्या गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यामध्येही भारतास ऑस्ट्रेलियाकडून 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता.

loading image
go to top