WTC फायनल निकाली लावण्यासाठी गावसकरांकडून ICC ला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sunil gavaskar

WTC फायनल निकाली लावण्यासाठी गावसकरांचा ICC ला सल्ला

ICC World Test Championship Final : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा पावसाने खेळखंडोबा केलाय. चार दिवसांच्या खेळात केवळ 141.1 षटकांत केवळ एका संघाचा पहिला डाव पूर्ण झाल्याचे पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या संघाने पहिला डाव सुरु केल्यानंतर हा सामना कुठेतरी अनिर्णित राहणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी विजेता ठरवण्यासाठी खास फॉर्म्युला सांगितला आहे.

कसोटी क्रिकेटमधील पहिली वहिली फायनल निकाली लावण्यासाठी तीन-चार दिवसाच्या अंतराने सामना पुन्हा खेळवण्याचा विचार करावा, अशी सूचना सुनील गावसकर यांनी आयसीसीला दिलीये. फुटबॉलमध्ये सामन्याचा निकाल हा पेनल्टी शूट आउटमध्ये केला जातो. टेनिसमध्ये पाच सेटनंतर टाय ब्रेकर असतो. त्याप्रमाणेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा निकाल लावण्यासाठी काहीतरी फॉर्म्यूला आजमावण्याची गरज आहे, असे गावसकरांनी म्हटले आहे. गावसकर म्हणाले की, 'सध्याच्या घडीला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ड्रॉ होणार असे दिसते. त्यामुळे ट्रॉफी संयुक्तरित्या देण्यात येईल. एखाद्या फायनलमध्ये असा प्रकार पहिल्यांदा दिसेल. त्यामुळे आयसीसीने यावर विचार करण्याची गरज आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जेमिन्सनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने भारताचा डाव 217 धावांत आटोपला. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ विराट कोहलीने 44 धावांची खेळी केली. रोहित शर्माने 34 धावांची भर घातली. पाचव्या दिवशी न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांवरुन खेळाला सुरुवात केली आहे. कर्णधार टॉम लॅथम 30 आणि डेवोन कॉन्वेने 54 धावांची दमदार खेळी केली होती. या दोघांची विकेट मिळवण्यात टीम इंडियाला यश आले. अश्विनने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. ईशांत शर्मालाही एक विकेट मिळाली.