esakal | IND vs ENG: "इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यावेळी काय केलं होतं ते विसरू नका"
sakal

बोलून बातमी शोधा

Sunil-Gavaskar-Virat-Kohli

"इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तेव्हा काय केलं होतं विसरू नका"

sakal_logo
By
विराज भागवत

सुनील गावसकरांचा कर्णधार विराट, BCCI ला सल्ला

Ind vs Eng 5th Test Cancelled: भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील पाचव्या कसोटीची सुरूवात आजपासून (१० सप्टेंबर) होणार होती. पण ही कसोटी (5th Test) कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) यांची दीर्घकाळ चर्चा झाली. त्यानंतर सामना सध्या तरी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, हा सामना पुनर्नियोजित करावा आणि दोन्ही संघाच्या सोयीनुसार खेळवावा अशी ऑफर BCCI ने ECB ला दिली आहे. BCCI चा हा प्रस्ताव अतिशय योग्य असल्याचे सांगत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी आपले महत्त्वपूर्ण मत मांडले.

हेही वाचा: IND vs ENG: पाचवा कसोटी सामना रद्द! BCCI- ECB चर्चेनंतर निर्णय

"भारत-इंग्लंड पाचवी कसोटी रद्द झाली ही बाब लक्षात घेतली तरी BCCI ने या सामन्याचे पुनर्नियोजन करण्याबद्दलचा ठेवलेला प्रस्ताव योग्यच आहे. इंग्लंडचा क्रिकेट संघ २००८ साली भारतात होता. त्यावेळी २६ नोव्हेंबरला मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. त्या हल्ल्यानंतर इंग्लंडचा संघ इंग्लंडला परतला होता. पण काही दिवसांनी उर्वरित दौरा पूर्ण करण्यासाठी ते परत आले होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ती शिष्टाई विसरून चालणार नाही", असा सूचक सल्ला गावसकर यांनी BCCI ला दिला.

हेही वाचा: IND vs ENG: सामना रद्द झाल्यावर शास्त्री गुरुजी ट्रोल; शिक्षेची होतेय मागणी

"इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केविन पीटरसन करत होता. 'आम्हाला सुरक्षित वाटत नाही. आम्ही पुन्हा भारताता मालिका खेळायला जाणार नाही', असा म्हणण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या संघाला आणि कर्णधाराला होता. पण केविन पीटरसनने संपूर्ण संघाला पटवून दिले की भारतात आपण आता पुन्हा गेलो तर आपण सुरक्षित असू. कोणाच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही. इतकंच नव्हे तर केविन पीटरसनने इंग्लंड क्रिकेट बोर्डालाही पटवून दिले की भारतात संघ पुन्हा उर्वरित मालिका खेळण्यास तयार आहे. त्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघाला पुन्हा भारतात येण्यास परवानगी दिली आणि एक उत्कृष्ट अशी मालिका पार पडली. त्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यावेळी काय केले होते ते BCCI ने कायम लक्षात ठेवायला हवे", अशा शब्दात गावसकरांनी आपलं मत मांडलं.

loading image
go to top