IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा 'विराट' विजय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav Virat Kohli Shine India Defeat Australia In 3rd T20I Seal The Series By 2 - 1

IND vs AUS : सूर्याची झळाळी अन् भारताचा 'विराट' विजय

IND vs AUS 3rd T20I : सूर्यकुमारचा 360 खेळ आणि विराट कोहलीची किंग साईज खेळी यावर हार्दिक पांड्याच्या स्मार्ट फटकेबाजीचे टॉपिंग अशी आहे विजयाच्या रेसीपी. भारताने ऑस्ट्रेलियाचे 187 धावांचे आव्हान 19.5 षटकात 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत मालिका 2 - 1 अशी जिंकली. भारताकडून सूर्यकुमारने 69 तर विराट कोहलीने 63 धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 25 धावा करत भारताला 1 चेंडू राखून सामना जिंकून दिला. गोलंदाजीत अक्षर पटेलने तीन विकेट घेतल्या. (Suryakumar Yadav Virat Kohli Shine India Defeat Australia In 3rd T20I Seal The Series By 2 - 1)

हेही वाचा: VIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला 'लकी'

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ठेवलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना भारताने दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावले. पहिल्याच षटकात केएल राहुल 1 धाव करून बाद झाला. तर रोहित फटकेबाजी करण्याच्या नादात 17 धावांवर बाद झाला.

भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावांची खेळी केली. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटकेबाजी करत विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 62 चेंडूत 104 धावांची भागीदारी रचली. मात्र हेजलवूडने त्याची खेळी 14 व्या षटकात संपुष्टात आणली. दरम्यान, चांगल्या सुरूवातीनंतर थोडी संथ झालेली खेळी विराट कोहलीने आक्रमक केली.

विराटने 37 चेंडूत 50 धावा करत भारताला 16 व्या षटकात 150 च्या जवळ पोहचवले. दरम्यान, भारताला विजयासाठी 18 चेंडूत 32 धावांची गरज होती. त्यावेळी 18 वे षटक टाकणाऱ्या पॅट कमिन्सच्या षटकात 11 धावा झाल्या. त्यामुळे आता टार्गेट 12 चेंडूत 21 धावा असे आले. हार्दिकने हेजलवूडच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पुढच्या तीन चेंडूत 1 धावच झाली. पाचव्या चेंडूवर विराटने 2 धावा केल्या. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 1 धाव काढली.

आता भारताला एका षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. स्ट्राईक विराट कोहलीकडे होते. विराटने डॅनियल सॅम्सच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सामना 5 चेंडूत 5 धावा असा आणला. मात्र दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहली 48 चेंडूत 63 धावा करून बाद झाला. आता भारताला विजयासाठी 4 चेंडूत 5 धावांची गरज होती. कार्तिकने एक धाव करत स्ट्राईक हार्दिक पांड्याकडे दिले. तीन चेंडूत 4 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याचा फटका हुकला. त्यामुळे सामना 2 चेंडूत 4 धावांची गरज होती. मात्र पांड्याने सॅम्सच्या वेगाचा फायदा घेत थर्डमॅनवरून चौकार मारला आणि सामना जिंकून दिला. भारताने मालिका 2 - 1 अशी जिंकली.

हेही वाचा: Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र भुवनेश्वर कुमारने त्याला 52 धावांवर बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. मॅक्सवेल 6 तर स्मिथ 9 धावा करून स्वस्तात माघारी गेले. मॅक्सवेलला अक्षरने धावबाद तर चहलने स्मिथला यष्टीचित केले.

ऑस्ट्रेलियाच्या पाठोपाठ दोन विकेट पडल्यानंतर टीम डेव्हिड आणि जॉश इग्निस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी कांगारूंचे शतक धावफलकावर लावले. मात्र अक्षर पटेलने 22 चेंडूत 24 धावा करणाऱ्या इग्निसला बाद केले. गेल्या दोन सामन्यात दमदार फलंदाजी करून भारतीय गोलंदाजांना जेरीस आणणाऱ्या मॅथ्यू वेडला अक्षर पटेलने अवघ्या 1 धावेवर पॅव्हेलियनचा रस्ता धरायला लावला.

मात्र स्लॉग ओव्हमध्ये पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमारची धुलाई झाली. 18 वे षटक टाकणाऱ्या भुवनेश्वर कुमारच्या शेवटच्या तीन चेंडूवर दोन षटकार आणि एक चौकार मारत टीम डेव्हिडने 21 धावा वसूल केल्या. डेव्हिडने डॅनियल सॅम्ससोबत 51 धावांची भागीदार रचली. 19 वे षटक टकाणाऱ्या बुमराहनेही 18 धावा दिल्या. शेवटच्या षटकात हर्षल पटेलने पहिलाच चेंडू फूल टॉस टाकत षटकार खाल्ला. मात्र त्यानंतर त्याने पुढच्या पाच चेंडूत 1 धाव देत एक विकेट घेतली. टीम डेव्हिडने 27 चेंडूत केलेल्या 54 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 7 बाद 186 धावा केल्या.