IND vs HK : सूर्या तळपला! 'विराट' विजयासह भारत सुपर 4 मध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav

IND vs HK : सूर्या तळपला! 'विराट' विजयासह भारत सुपर 4 मध्ये

India vs Hong Kong 4th Match Group A : भारताने हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव करत सुपर 4 मध्ये प्रवेश केला. भारताने ठेवलेल्या 193 धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगला धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. तर विराट कोहलीने आपला फॉर्म परत मिळवत 44 चेंडूत नाबाद 59 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी रचली.

भारताने ठेवलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगची सुरूवात खराब झाली. अर्शदीप सिंगने हाँगकाँगला पहिला धक्का दिला. त्याने यासीम मुर्तझाला 9 धावांवर बाद केले. त्यानंतर निझाकत खान आणि बाबर हयात यांनी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जडेजाने ही जोडी फोडली. त्याने निझाकत खानला 10 धावांवर धावबाद केले.

यानंतर हयातने आक्रमक खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र जडेजाने त्याची खेळी 41 धावांवर संपवली. किंचित शाहने 30 धावांची खेळी करत हाँगकाँगला शतक पार करून दिले. मात्र भुवनेश्वरने त्याला बाद करत त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. आवेशनेही इजाज खानची विकेट घेत स्वतःचे खाते उघडले. अखेर हाँगकाँगने 20 षटकात 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून आवेश खान, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, भारताने हाँगकाँगविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 192 धावा चोपल्या. संथ सुरूवातीनंतर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने तिसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत नाबाद 98 धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादवने 26 चेंडूत नाबाद 68 धावांची आक्रमक खेळी केली. तर विराट कोहलीने 44 चेंडूत 59 धावा केल्या.

भारताने प्रथम फलंदाजी करताना संथ सुरूवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी 5 षटकात 38 धावांची सलामी दिली. मात्र धावांची गती वाढवण्याच्या नादात रोहित शर्मा 21 धावा करून करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहली यांनी बॉल टू रन धावा करत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी रचली.

मात्र केएल राहुल 39 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आला आणि त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यास सुरूवात केली. विराट कोहलीनेही आपला गिअर बदलला. या दोघांनी आपल्या भागीदारीची सुरूवात 14 व्या षटकापासून केली. त्यांनी पुढच्या सहा चेंडूत 98 धावांची दमदार भागीदारी रचत भारताला 192 धावांपर्यंत पोहचवले.