
पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन या दोन भारतीय अनुभवी खेळाडूंना अद्याप सूर गवसलेला नाही. आता स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार असून, या स्पर्धेमध्ये लय मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करताना दिसणार आहेत.
महिला विभागातील एकेरी गटात पी. व्ही. सिंधू हिच्यासमोर सलामीच्या लढतीत भारताच्याच मालविका बन्सोड हिचे आव्हान असणार आहे. मालविका ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला खेळाडू आहे. त्यामुळे या दोन भारतीय खेळाडूंमधील लढत चुरशीची होण्याचे संकेत मिळाले आहेत. सिंधूला ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. मालविका हिने मात्र ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत सिंगापूरच्या यिओ जिया मिन हिला पराभूत केले होते. त्यामुळे सिंधूविरुद्धच्या लढतीत मालविका हिचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.