Syed Mushtaq Ali Trophy : हैदराबाद आउट; तामिळनाडूनं गाठली फायनल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tamil Nadu vs Hyderabad
Syed Mushtaq Ali Trophy : हैदराबाद आउट; तामिळनाडूनं गाठली फायनल!

Syed Mushtaq Ali Trophy : हैदराबाद आउट; तामिळनाडूनं गाठली फायनल!

Syed Mushtaq Ali Trophy 2021 22 : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये तामिळनाडूनं धमाकेदार विजय नोंदवला. हैदराबादच्या संघाला 8 गडी आणि 34 चेंडू राखून पराभूत करत त्यांनी फायनल गाठली. तामिळनाडूचा कर्णधार विजय शंकरने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तामिळनाडूचा मध्यम गती गोलंदाज पी सरवना कुमार (P Saravana Kumar) च्या माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. 32 वर्षीय गोलंदाजाने 3.3 षटकात 2 निर्धाव षटके टाकत 21 धावा खर्च करून अर्धा संघ तंबूत पाठवला.

हैदराबादच्या तनय थंगराजन (Tanay Thyagarajan) याने 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केलेल्या 25 धावा ही हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या हैदराबादचा संघ 18.3 षटकात 90 धावांतच गारद झाला.

हेही वाचा: Video : हिटमॅनसाठी कायपण; चाहत्याने थेट मैदानात शिरुन धरले पाय

हैदराबादने दिलेल्या 91 धावांचा पाठलाग करताना तामिळनाडूची सुरुवातही खराब झाली. यष्टीरक्षक फलंदाज अवघ्या एका धावेची भर घालून बाद झाला. सलामीवीर हरिश निशांथलाही संघाच्या धावसंख्येत 14 धावांचीच भर घालता आली. सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार विजय शंकर आणि साई सुदर्शन यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साई सुदर्शनने (Sai Sudharsan) 31 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने नाबाद 34 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला विजय शंकरने (Vijay Shankar) 40 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 43 धावांची नाबाद खेळी केली.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

तामिळनाडू फायनलमध्ये कोणाविरुद्ध भिडणार?

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर कर्नाटक आणि विदर्भ यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना खेळवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारच्या सत्रात होणाऱ्या या सामन्यात विजेता फायनलसाठी पात्र ठरेल. यातील विजेता आणि तामिळनाडू यांच्यात सोमवारी 22 नोव्हेबरला फायनल सामना रंगेल. हा सामना देखील अरुण जेटली स्टेडियवरच नियोजित आहे.

loading image
go to top