Syed Mushtaq Ali Trophy : दर्शनची हॅटट्रिक व्यर्थ, विदर्भाला नमवत कर्नाटक फायनलमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka vs Vidarbha

दर्शनची हॅटट्रिक व्यर्थ, विदर्भाला नमवत कर्नाटक फायनलमध्ये

sakal_logo
By
सुशांत जाधव

मनिष पांड्येच्या नेतृत्वाखालील कर्नाटक संघाने अटितटीच्या लढतीत विदर्भाचा खेळ खल्लास करत दिमाखात फायनल गाठलीये. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील सेमी फायनलचा दुसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटकने निर्धारित 20 षटकात 176 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 6 गड्यांच्या मोबदल्यात 172 धावांपर्यंत मजल मारु शकला.

अथर्व तायडे आणि गणेश सतीश या जोडीनं विदर्भाच्या डावाची सुरुवात केली. दोघांच्यात अर्धशतकी भागीदारी होतेय अस वाटतं असताना करिप्पानं मनिष पांड्ये करवी अथर्वला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या. त्यापाठोपाठ काही अतंराने सचीतने गणेश सतिशला 31 धावांवर तंबूत धाडले. कर्णधार अक्षय वाडकरला करुण नायरने 15 धावांवर चालते केले. शिवम दुबे 24(16), जितेश शर्मा 12 (9) आणि अक्षय करणेवार 22 धावा करुन माघारी परतला. अपूर्व वानखडेनं 22 चेंडूत नाबाद 27 धावांची खेळी केली. पण त्याची ही खेळी संघाला फायनलपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरली.

हेही वाचा: कदम- पांड्येचा अर्धशतकी तडका; विदर्भासमोर ठेवलं मोठ लक्ष्य

कर्नाटककडून केसी करिप्पाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. करुण नायर, जगदीशा सुचीत, विद्याधर पाटील आणि दर्शन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. विदर्भाला नाणेफेक जिंकूनही सामना गमावण्याची वेळ आली. या सामन्यातील पराभवासह त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. सोमवारी अरुण जेटली मैदानावर तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्यात फायनल रंगणार आहे. दुपारी 12 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

विदर्भाच्या नलकांडेची हॅटट्रिक ठरली व्यर्थ

कर्नाटकच्या डावातील अखेरच्या षटकात दर्शन नलकांडेनं 4 चेंडूत चार बळी घेतले. त्याच्या हॅटट्रिकमुळे विदर्भाने कर्नाटकला 180 + धावा करण्यापासून रोखले होते. पण त्याची ही हॅटट्रिक संघाला फायनलमध्ये घेऊन जाण्यात उपयुक्त ठरली नाही. धावांचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 4 धावांनी पिछाडीवर राहिला आणि त्यांचे फायनलमध्ये खेळण्याचे स्वप्न भंगले.

loading image
go to top