esakal | भारत दौऱ्यातून आमचे अस्तित्व कळेल ः रबाडा
sakal

बोलून बातमी शोधा

भारत दौऱ्यातून आमचे अस्तित्व कळेल ः  रबाडा

आमचा संघ संक्रमणाच्या प्रक्रियेत आहे. येत्या भारत दौऱ्यात आम्ही जागतिक क्रिकेटच्या नकाशावर कोणत्या ठिकाणावर आहोत हे स्पष्ट होईल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने व्यक्त केले. 

भारत दौऱ्यातून आमचे अस्तित्व कळेल ः रबाडा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: आमचा संघ संक्रमणाच्या प्रक्रियेत आहे. येत्या भारत दौऱ्यात आम्ही जागतिक क्रिकेटच्या नकाशावर कोणत्या ठिकाणावर आहोत हे स्पष्ट होईल, असे मत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने व्यक्त केले. 

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात तीन ट्‌वेन्टी-20 आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला ट्‌वेन्टी-20 सामना 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. मी मनापासून पुढील दोन वर्षांचा विचार करत आहे. पुढील प्रवासासाठी हे आव्हानच असणार आहे. संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे; परंतु भारत दौऱ्यातून आम्ही नेमके कोठे आहोत हे समजून येईल, असे रबाडाने पीटीआयशी बोलताना सांगितले. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रथम साखळीतच आव्हान संपुष्टात आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिलीच मालिका असणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असले, तरी टी-20 मध्ये भारत दक्षिण आफ्रिकेपेक्षा एका स्थानाने पाठी आहे. सर्वोत्तम संघाबरोबर आम्ही कोठे आहोत हे पहायचे आहे. गेल्या काही वर्षांपासून भारत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा संघ ठरला आहे. आमचा संघ नवोदितांचा असल्याने आम्हालाही संधी आहे, असे रबाडाने सांगितले. 

फाफ डुप्लेसीची माघार, इम्रान ताहीर आणि हाशिम आमला यांची निवृत्ती आणि डेल स्टेनला वगळण्यात आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अनुभवात कमी आहे. तरीही रबाडा सकारात्मक विचार करत आहे. संक्रमणाच्या या काळाकडे सकारात्मकतेच्या नजरेतून पाहिले पाहिजे. ज्या खेळाडूंबरोबर मी शालेय क्रिकेट स्तरावर खेळलेलो आहे, त्या खेळाडूंबरोबर खेळणार असल्याचा आनंद आहे, असे 24 वर्षीय रबाडा म्हणाला. 

भारत दौऱ्यासाठी एनोच एक्वे हे दक्षिण आफ्रिकेचे हंगामी मार्गदर्शक आहेत. एक्‍वे हे रबाडाचे शालेय स्तरावरचेही मार्गदर्शक होते. त्यामुळे रबाडासाठी पुढील प्रवास सोपा असणार आहे. आमचा संघ अनुभवात कमी असला तरी बलाढ्य भारताविरुद्ध आम्ही जिंकू, असा विश्‍वास रबाडाने व्यक्त केला. 
 

loading image
go to top