मिरज : खंडेराजुरी येथे ज्युनियर राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेला प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 September 2019

  • 21 व्या सबज्युनियर व 32 व्या ज्युनियर राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेला खंडेराजुरी (ता. मिरज) येथे सुरुवात
  • स्पर्धा रॉयल अकॅडमीच्या दंडोबा हिल्स येथील मैदानावर 4 ते 6 सप्टेंबअखेर तीन दिवस
  • देशभरातील 17 राज्यांचे 45 संघ या स्पर्धेत सहभागी
  • महापौर संगीता खोत व टग ऑफ वॉर इंडिया असोसिएशनच्या सचिव माधवी पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन.

मिरज - 21 व्या सबज्युनियर व 32 व्या ज्युनियर राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेला खंडेराजुरी (ता. मिरज) येथे सुरुवात झाली. स्पर्धा रॉयल अकॅडमीच्या दंडोबा हिल्स येथील मैदानावर 4 ते 6 सप्टेंबअखेर तीन दिवस चालणार आहे. देशभरातील 17 राज्यांचे 45 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महापौर संगीता खोत व टग ऑफ वॉर इंडिया असोसिएशनच्या सचिव माधवी पाटील यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून उद्‌घाटन झाले. 

सहभागी संघांनी शानदार संचलन करत पाहुण्यांना मानवंदना दिली. असोसिएशनच्या सचिव माधवी पाटील म्हणाल्या, राष्ट्रीय स्पर्धा संयोजनाचा मान शक्‍यतो शहरी भागातील संयोजकांना दिला जातो. मात्र यंदा प्रथमच या स्पर्धा ग्रामीण भागात होत आहेत. उत्कृष्ट नियोजन, वातावरण, खेळाडूंची सोय, क्रीडांगण या सर्व गोष्टींचे संयोजन चांगले आहे. 

एकलव्य अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष शहाजी शिंदे, प्राचार्या सौ. गीतांजली शिंदे प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेसाठी दिल्ली, पंजाब, जम्मू काश्‍मिर, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, केरळ, ओरिसा, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यातून संघ आले आहेत. एकलव्य अकॅडमी, रॉयल ऑफिसर्स प्रिपरेटरी अकॅडमी, सांगली डिस्ट्रिक्‍ट टग ऑफ वॉर असोसिएशन यांच्या संयोजनातून स्पर्धा होत आहे. 

यावेळी महाराष्ट्र टग ऑफ वॉरचे सचिव जनार्दन गुपिले, इंडिया असोसिएशनचे सचिव निर्मलकुमार चक्रवर्ती, कर्नाटकचे गंगाधरिया, केरळचे अबु बुखार, टुर्नामेंट डायरेक्‍टर गौरव दीक्षित, सिध्देवाडीचे माजी सरपंच अण्णासाहेब खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tug of war National Competition in Khanderajuri