Twenty20 cricket : सूर्यकुमार यादवच्या यंदा सर्वाधिक धावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suryakumar yadav

Twenty20 cricket : सूर्यकुमार यादवच्या यंदा सर्वाधिक धावा

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या ट्वेन्टी-२० सामन्यात आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात आक्रमक अर्धशतक झळकावल्याने भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात एका वर्षात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

सूर्यकुमारने २०२२ मध्ये २१ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत ७३२ धावा केल्या आहेत. त्याने शिखर धवनचा २०१८ मधील ६८९ धावांचा विक्रम मोडीत काढला. आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात १७३.३६ च्या धावगतीने धावा करणारा सूर्यकुमार कारकिर्दीत १००० धावांचा टप्पा गाठण्यापासून फक्त २४ धावा दूर आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३ षटकार लगावल्यानंतर एकाच वर्षात सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रमही सूर्यकुमारच्या नावावर नोंदवला गेला आहे. सूर्यकुमारने २०२२ मध्ये २१ डावांत ४५ षटकार लगावले आहेत. याआधी पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलच्या नावावर आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० मध्ये एका वर्षात सर्वात जास्त (४१) षटकार लगावल्याचा विक्रम होता. भारताचा या वर्षीचा ट्वेन्टी-२० मोसम अजून बाकी असून सूर्यकुमारला या वर्षात अजून षटकार मारण्याची नामी संधी उपलब्ध आहे. सुर्यकुमारच्या नावावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामन्यात एक शतक आणि आठ अर्धशतकांची नोंद आहे.