COVID-19 Vaccine : टीम इंडिया इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccine

COVID-19 Vaccine : टीम इंडिया इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) आणि इंग्लंड दौऱ्यावरील (England Tour) पाच कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 2 जूनला भारतीय संघ विशेष विमानाने इंग्लंडला रवाना होणार आहे. भारतात कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर दौऱ्यावर जाणारे सर्व खेळाडू दुसरा डोस (COVID 19 vaccine) इंग्लंडमध्ये घेतील. एएनआयने UK हेल्थ डिपार्टमेंटचा हवाला देत यासंदर्भातील माहिती दिली आहे. भारतीय संघातील खेळाडूंना UK तील नियमावलीनुसार, कोरोनाचा डोस दिला जाईल, असेही वृत्तामध्ये म्हटले आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यानच सर्व खेळाडूंना कोरोनाची लस दिली जाणार, अशी चर्चा रंगली होती. (UK health department to administer second dose- of COVID 19 vaccine for Kohli and boys)

काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. दुसरीकडे भारत सरकारने 18 वर्षांच्यावरील नागरिकांसाठीचे लसीकरणाला सुरुवात केली होती. प्रत्येक खेळाडूने आपापल्या शहरात लस घ्यावी, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. खेळाडूंनी कोवॅक्सिनऐवजी कोविशील्डचा डोस घेण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला होता. इंग्लंडमध्ये दुसरा डोस सहज उपलब्ध होईल, त्यामुळे टीम इंडियातील खेळाडूंना अशी सूचना करण्यात आली होती.

इंग्लंड दौऱ्यावर जाणारे खेळाडू बुधवारी मुंबईत एकत्रित जमणार आहेत. तत्पूर्वी प्रत्येक खेळाडूला घरी असताना तीन RT PCR टेस्टमधून जावे लागले. मुंबईत दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर संघ इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतरही संघाला क्वांरटाईनची प्रक्रियेतून जावे लागेल. याठीकाणी 10 दिवस खेळाडू क्वारंटाईन असतील. त्यानंतर ते न्यूझीलंड विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट फायनलसाठी सराव करण्याचा मार्ग मोकळा होईल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट फायनलशिवाय टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामनेही खेळणार आहे. भारतीय संघाचा इंग्लंड दौरा खूप मोठा असल्यामुळे या दौऱ्यावर निवड झालेल्या खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्ये घ्यावा लागेल. भारतीय संघात निवड झालेल्या जवळपास सर्वांनी पहिला डोस घेतला आहे. UK मधील नियमावलीनुसार भारतीय खेळडूंना दुसरा डोस मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.