Umesh Yadav : कन्यारत्न प्राप्त! महिला दिनीच उमेश यादवच्या घरी उमटली लक्ष्मीची पावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umesh Yadav Blessed with baby girl

Umesh Yadav : कन्यारत्न प्राप्त! महिला दिनीच उमेश यादवच्या घरी उमटली लक्ष्मीची पावले

Umesh Yadav Blessed with baby girl : भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी मालिका अर्ध्यात सोडून घरी परतावे लागले. वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून उमेश यादव हा इंदूर येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळला. त्याने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज बाद करून दमदार कामगिरी केली.

वडिलांच्या जाण्याने उमेशवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आता हा दुःखाचा डोंगर हलका करण्यासाठी उमेश यादवच्या घरी लक्ष्मीच्या पावलाने चिमुकलीचे आगमन झाले आहे. उमेश यादवने ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याचे माहिती दिली. विशेष म्हणजे महिला दिनालाच उमेश यादवला कन्यारत्न प्राप्त झाले आहे.

उमेश यादव हा भारतीय कसोटी संघात आत बाहेर करत असतो. मात्र जर मायदेशात कसोटी मालिका असेल तर उमेश यादव आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवतोच. बऱ्याच काळानंतर तिसऱ्या कसोटीत उमेश यादवला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. संघ व्यवस्थापनाने मोहम्मद शमीला विश्रांती दिली.

दुर्मीळ अशी संधी मिळालेल्या उमेश यादवने या संधीचे सोने केले. इंदूर कसोटीत भारतीय संघात तीन फिरकी गोलंदाज होते. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना तशीही गोलंदाजीची संधी कमी मिळणार होती. मात्र त्यातही उमेश यादवने मोक्याच्या क्षणी आणि महत्वाच्या तीन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. याचदरम्यान, उमेश यादवने मिचेल स्टार्कला बाद करत आपली भारतातील 100 वी कसोटी विकेट साजरी केली.

मात्र आता अहमदाबाद कसोटीत मोहम्मद शमी संघात परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेश यादवला पुन्हा एकदा बेंचवर बसावे लागण्याची शक्यता आहे. जर खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असेल तर भारत कुलदीप यादवला किंवा अतिरिक्त फलंदाज म्हणून सूर्यकुमार यादवला खेळवण्याची शक्यता आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...