भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 'या' खेळाडूवर एका वर्षाची बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

मनजोत कालरा याच्यावर रणजी क्रिकेटमधून 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर वयोगट स्पर्धांमध्ये खेळण्यापासून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

दिल्ली : भारतातील अनेक क्रीडा प्रकारांमध्ये वय चोरीच्या प्रकारणांवरून खळबळ उडाली आहे. क्रिकेटसह इतरही क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू वयचोरी करत असल्याचं समोर येत आहे. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं समालोचन करताना भारताचा माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने थेटपणे याविषयी भाष्य केलं होतं.

'भारतात सर्वच खेळाडू वयचोरी करत असतात. तुम्ही तुमच्या काळात असं केलं असेल,' असं एका खेळाडूला उद्देशून वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता. अशीच वयचोरी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला आता दणका बसला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मागील अंडर-19 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तडाखेबंद शतक झळकावून भारताला विजय मिळवून देणाऱ्या सलामीवीर मनजोत कालरा या क्रिकेटपटूचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. मनजोत कालरा याला अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये खेळताना कथित वयचोरी केल्याप्रकरणी दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशनने रणजी ट्रॉफी खेळण्यापासून एका वर्षाची बंदी घातली आहे.

मनजोत कालरा याच्यावर रणजी क्रिकेटमधून 1 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर वयोगट स्पर्धांमध्ये खेळण्यापासून 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. BCCI रेकॉर्ड्सनुसार मनजोत कालरा याचं वय 20 वर्ष 351 दिवस इतकं आहे. कालरा मागील आठवड्यात दिल्ली अंडर-23 संघाकडून बंगालविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला होता.

या सामन्यात त्याने 80 धावाही फटकावल्या होत्या. त्यामुळे मनजोत कालरा हा रणजी टीममध्ये शिखर धवन याची जागा घेण्याच्या स्पर्धेत होता. परंतु आता तो वर्षभरासाठी रणजी क्रिकेट खेळू शकणार नाही.

एकीकडे मनोजत कालरा याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असतानाच दिल्लीचा उपकर्णधार नितीश राणा याच्यावरील वयचोरीप्रकरणीच कारवाई मागे घेण्यात आली आहे. पुरेसे पुरावे सादर करा, अशा सूचना देत नितीश राणा याला सोडून देण्यात आलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशनमध्ये दीपक वर्मा हे नवे लोकपाल म्हणून येणार आहेत. त्यामुळे दीपक वर्मा हे मनजोत कालरा प्रकरणात पुन्हा नव्याने तपास करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसंच वयचोरीवरून कालरा याला सीनिअर स्तरावरील क्रिकेट खेळण्यापासून का रोखण्यात आलं आहे, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: under 19 cricketer manjot kalra suspended from ranji trophy for 1 year for age fudging