esakal | विजय हजारे करंडक : विदर्भाने नोंदविला पहिला विजय; आदित्य सरवटेची अष्टपैलू कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha team won first match of Vijay Hajare trophy

एमराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत आदित्यने गोलंदाजीत तीन बळी टिपल्यानंतर अवघ्या २३ चेंडूंत नाबाद ३९ धावा फटकावून विदर्भाला शानदार विजय मिळवून दिला.

विजय हजारे करंडक : विदर्भाने नोंदविला पहिला विजय; आदित्य सरवटेची अष्टपैलू कामगिरी

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : फिरकीपटू आदित्य सरवटेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विदर्भाने इंदूर येथे सुरू असलेल्या विजय हजारे करंडक (एलिट ब गट) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या साखळी सामन्यात यजमान मध्यप्रदेशचा चार गड्यांनी सहज पराभव केला. या पहिल्या विजयासह विदर्भाने चार गुणांची कमाई करून बादफेरीच्या शर्यतीतील आपला दावा कायम ठेवला आहे.

Video : नागपूर ब्रेकिंग : शनिवारी, रविवारी बाजारपेठा तर शाळा, महाविद्यालये ७...

एमराल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कुलच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या संघर्षपूर्ण लढतीत आदित्यने गोलंदाजीत तीन बळी टिपल्यानंतर अवघ्या २३ चेंडूंत नाबाद ३९ धावा फटकावून विदर्भाला शानदार विजय मिळवून दिला. २४४ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार फैज फजल (४३ धावा) व आर. संजय (३२ धावा) या सलामी जोडीने ६३ धावांची दमदार सुरूवात करून विजयाचा भक्कम पाया रचला. 

त्यानंतर मधल्या फळीतील अनुभवी गणेश सतीश, यश राठोड, सरवटे व दर्शन नळकांडेने भरीव योगदान देत विजयाला थाटात गवसणी घातली. विदर्भाकडून सतीशने सर्वाधिक ४७ धावा काढल्या. तर गेल्या सामन्यातील शतकवीर राठोडने ३९ धावांची आकर्षक खेळी केली. दर्शनने १६ चेंडूंत नाबाद १९ धावांचे योगदान दिले.

त्याअगोदर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या मध्यप्रदेशला विदर्भाच्या गोलंदाजांनी निर्धारित ५० षटकांत ९ बाद २४३ धावांवर रोखून धरले. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेने ३९ धावांमध्ये सर्वाधिक तीन गडी बाद करून यजमानांना अडीचशेच्या आत थोपवून धरले. मध्यप्रदेशकडून कर्णधार पार्थ सहानीने ५८ चेंडूंत नाबाद ६८ व आदित्य श्रीवास्तवने ६७ चेंडूंत ५२ धावा काढल्या. विदर्भाचा तिसरा साखळी सामना झारखंडविरुद्ध येत्या २४ तारखेला खेळला जाणार आहे. विदर्भाला सलामी लढतीत आंध्रप्रदेशकडून तीन गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता.

प्रेरणादायी! आईच्या निधनानंतरही धावपटू निकिताने जिंकले...

संक्षिप्त धावफलक

मध्यप्रदेश : ५० षटकांत ९ बाद २४३ (पार्थ सहानी नाबाद ६८, आदित्य श्रीवास्तव ५२, रजत पाटीदार ३८, शुभम शर्मा ३६, अभिषेक भंडारी ३१, आदित्य सरवटे ३/३९, दर्शन नळकांडे १/५५, आदित्य ठाकरे १/४३, शुभम दुबे १/४३).

विदर्भ : ४८.५ षटकांत ६ बाद २४६ (गणेश सतीश ४७, फैज फजल ४३, आदित्य सरवटे नाबाद ३९, यश राठोड ३९, आर. संजय ३२, दर्शन नळकांडे नाबाद १९, अक्षय वाडकर ११, कुमार कार्तिकेय सिंग १/४७, गौरव यादव १/४४, शुभम शर्मा १/४४).

संपादन - अथर्व महांकाळ