
Vijay Hazare Trophy : संजू सॅमसन फेल, केरळ 175 धावात ऑल आऊट
जयपूर : विजय हजारे ट्रॉफीतील (Vijay Hazare Trophy) उपांत्यपूर्व फेरीतील सर्व्हिसेसने नाणेफेक जिंकून केरळला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले. आयपीएल स्टार संजू सॅमसन केरळचे नेतृत्व करत आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळला 175 धावांपर्यंतच मजल मारता आली. केरळ (Kerala cricket team) कडून सलामीवीर रोहन कुन्नूमलने 85 धावांची झुंजार खेळी केली. त्याला विनूप मनोहरन याने 41 धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. मात्र स्टार संजू सॅमसनला (Sanju Samson) फारशी चमक दाखवता आली नाही. तो अवघ्या 2 धावांची भर घालून माघारी परतला.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळने 24 धावांवर मोहम्मद अझरुद्दीन आणि जलल सक्सेना या दोन फलंदाजांना गमावले. त्यानंतर सलामीवीर रोहन कुन्नूमल (Rohan Kunnummal) आणि विनूप मनोहरन यांनी तिसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागिदारी रचत केरळला शंभरी पार करुन दिली. मात्र पुलकीत नारंगने मनोहरनला 41 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. तेथूनच केरळच्या फलंदाजीला गळती लागली.
मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज सचिन बेबी 12 धावा करुन बाद झाला. त्यानंतर केरळच्या 150 धावा झाल्या असताना संजू सॅमसन (Sanju Samson) 2 धावांची भर घालून बाद झाला. त्या पाठोपाठ रोहन कुन्नूमल देखील 85 धावा करुन बाद झाला. हे दोघे बाद झाल्यानंतर सर्व्हिसेसने केरळचा संपूर्ण डाव 175 धावात गुंडाळला. सर्व्हिसेसकडून दिवेश पथानियाने 3 तर पुलकीत नारंगने 2 विकेट घेतल्या.