ब्रॉंझपदकाच्या लढतीत विजय पाटीलची हार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या फ्री स्टाईल गटात 86 किलो गटाची अंतिम फेरी गाठली, पण कोल्हापूरच्या विजय पाटील याला ब्रॉंझ पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली.

मुंबई : दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या फ्री स्टाईल गटात 86 किलो गटाची अंतिम फेरी गाठली, पण कोल्हापूरच्या विजय पाटील याला ब्रॉंझ पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली.

दीपक पुनियाने जॉर्जियाच्या मिरिआनी मैसुराद्‌झे याला पराजित करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. एस्टोनियात सुरु असलेल्या या स्पर्धेत दीपकची सुवर्णपदकाची लढत बुधवारी होणार आहे. दरम्यान, विजय पाटील रशियाच्या अकमद इद्रिसॉव याच्याविरुद्ध 0-10 असा एकतर्फी सामन्यात पराजित झाला.

विजय पाटील तसेच आकाश अंतिल यांनी रिपेचेजद्वारे ब्रॉंझ पदकाची संधी मिळवली होती. विजयने रिपेचेज लढतीत जॉर्जियाच्या गॉर्गी गेगेलाश्वीली याचा 12-11 असा पराभव केला. आकाश अंतिलने रिपेचेजमध्ये पाकिस्तानच्या हरुन अबीद याला 2-0 आणि रशियाच्या आसियानबेक गॅझाएव याला 7-6 हरवून ब्रॉंझ पदक जिंकण्याची संधी मिळवली.

दीपक पुनियाने 86 किलो गटात उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत हंटर जाफरी ली याचा 5-1 असा पराभव केला. दीपकने यापूर्वी हंगेरीच्या मिलान अँद्रास कॉरस्कॉग याच्याविरुद्ध 10-1 असा विजय मिळवला होता.

प्रवीण मलिकला 74 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जिंतारा मोतोयामा याच्याविरुद्ध 0-10 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. आता जिंताराने अंतिम फेरी गाठल्यासच प्रवीणला रिपेचेजद्वारे ब्रॉंझची संधी असेल. त्याने यापूर्वी व्हॅलेंटीन बोर्झीन याला 8-5 असे हरवले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vijay patil lost bronze medal match in world wrestling