IPL 2019 : आमची सध्याची स्थिती लायकीप्रमाणे : विराट

Virat Kohli
Virat Kohli

बंगळूर : सामन्याची सूत्रे हाती असताना पराभवाची नामुष्की आल्यामुळे विराट कोहली आपल्या गोलंदाजांवर कमालीचा भडकला. आयपीएलमध्ये सध्या ज्या स्थानावर आहोत तेथेच राहण्याची लायकी आहे, असे संतापजनक उद्‌गार त्याने काढले. सलग पाचव्या पराभवामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूर तळाच्या स्थानी कायम राहिले आहे. 

206 धावांचे मोठे लक्ष्य पार करणारा कोलकाता संघाने अखेरच्या 24 चेंडूंत आवश्‍यक असलेले 66 धावांचे आव्हान पाच चेंडू राखून पार केले. त्यामुळे बंगळूरच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला. परिणामी, त्यांच्या खात्यातील भोपळा कायम राहिला. 
आम्ही हा सामना कोठे गमावला, हे सांगायची गरज नाही. अखेरच्या चार षटकांत आम्ही केलेल्या गोलंदाजीचे समर्थन करताच येणार नाही. थोडीशी तरी हुशारी दाखवायला हवी, दडपणाखाली आमचे गोलंदाज हाय खातात, हीच आतापर्यंतची आमची रडकथा राहिली आहे, असे कोहली उद्वेगाने म्हणाला. 

"पॉवर हिटर' आंद्र रसेलने अवघ्या 13 चेंडूंत नाबाद 48 धावांचा झंझावात करून बंगळूरसाठी होत्याचे नव्हते केले. रसेलसमोर निर्णायक षटकांत तुम्ही थोडातरी विचार करून गोलंदाजी केली नाही, तर परिस्थिती एकदमच अवघड होऊन जाते. आम्ही दडपणाखाली थोडाही संयम दाखवला नाही. त्यामुळे तळाच्या स्थानी राहाण्याचीच आमची लायकी आहे, असा संताप कोहलीने व्यक्त केला. 

या सामन्यातून कोहलीची फलंदाजी बहरली. त्याने 84 धावांची खेळी केली; परंतु या खेळीवरही तो समाधानी नव्हता. आम्ही आणखी 20 ते 25 धावा करायला हव्या होत्या. अंतिम क्षणी डिव्हिल्यर्सला जास्त स्ट्राईक मिळाला नाही. तरीही द्विशतकी धावा केल्यानंतर सामना जिंकण्याचे धैर्य आम्हाला दाखवता आले नाही. 

अखेरच्या चार षटकांत तुम्ही 75 धावांचेही संरक्षण करू शकत नसाल, तर संपूर्ण सामन्यात तुम्ही 100 धावाही रोखू शकत नाही. आपल्याकडून नेमक्‍या कोणत्या चुका होत आहेत, यावर चर्चा करत असतो; परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही. कधी-कधी चर्चाही कामी येत नसते, असे विराटने सांगितले. 

पुढच्या सामन्यात अधिक जोरदार पुनरागमन करण्यासाठी आता खेळाडूंना वेळ द्यायला हवा. आतापर्यंतची कामगिरी फारच निराशाजनक झालेली असली, तरी आम्ही उमेद गमावलेली नाही, अजूनही प्रगती करण्याची आशा आहे. 
- विराट कोहली, आरसीबी कर्णधार 

सर्वाधिक धावांचा उच्चांक 
- आयपीएल कारकिर्दीत विराटच्या 5110 धावा. विराटची कामगिरी ः 168 सामने-160 डाव-5110 धावा-4 शतके-35 अर्धशतके-452 चौकार-179 षटकार 
- सुरेश रैनाचा 5086 धावांचा उच्चांक मागे टाकला. 
- किंग्ज इलेव्हनविरुद्धच्या डावानंतर रैनाची कामगिरी ः 181 सामने-177, डाव-5103 धावा-1 शतक-35 अर्धशतके-462 चौकार-188 षटकार. 

सर्वाधिक पराभवही वाट्याला 
- आयपीएलच्या 12 पर्वांत मिळून विराटचा खेळाडू म्हणून 86वा पराभव 
- प्रतिस्पर्धी केकेआर संघातील रॉबिन उथप्पा याचे 85 पराभव 
- यानंतरची क्रमवारी अशी ः रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स-81 पराभव), दिनेश कार्तिक (केकेआर-79), अमित मिश्रा (दिल्ली कॅपिटल्स) - एबी डिव्हिलीयर्स (आरसीबी - प्रत्येकी 75) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com