INDvsAUS : 'तापट' कोहली भिडणार 'स्लेजिंग'च्या बादशाहांना

cricket
cricket

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ आणि स्लेंजिंग हे जणू समीकरणच बनले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ जेव्हा जेव्हा समोर आले आहेत तेव्हा प्रत्येकवेळी मोठे वादविवाद झालेच आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका उद्यापासून सुरु होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने नेहमीच भारतीय खेळाडूंना स्वत:हून डिवचण्याचे प्रकार केले आहेत. 2008 मध्ये ऍण्ड्र्यू सायमंड्स आणि हरभजन यांच्यातील मंकी गेट प्रकरणाने सुरु झालेला वाद आजपर्यंत संपलेला नाही.

1. मंकीगेट प्रकरण 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला हा सर्वांत मोठा वाद होता. 2007-08 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू अॅन्ड्रू सायमंड्सने भारताचा माजी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. त्यामुळे दोन्ही संघांतील संबंध बरेच ताणले गेले होते. या प्रकरणात हरभजनसिंगवर तीन सामन्यांची बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भारताने दौरा सोडून मायदेशी जाण्याची धमकी दिल्याने त्याच्यावरील बंदी हटविण्यात आली आणि मालिका पूर्ण करण्यात आली.

2. पॉंटींगने स्वत:च पंचाची कामगिरी बजावली
मंकीगेट प्रकरण कमी होते की काय म्हणून सिडनी कसोटी दरम्यान सौरभ गांगुली आणि रिकी पॉंटींग यांच्यातही चांगलेच वाद झाले. सिडनी कसोटी सामन्यात दादाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत तडाखेबाद अर्धशतक साजरे केले. मात्र त्यानंतर ब्रेटलीच्या आऊट स्वींगरवर मायकेल क्लार्कने त्याचा झेल पकडत त्याला बाद केले. तिसऱ्या पंचानी पाहिल्यावर चेंडू जमिनीला लागल्याचा भास होत होता. मात्र, पंचानी आपला निर्णय देण्याआधीच पॉंटीगने बोट वर करत दादा बाद असल्याचे जाहीर केले. त्यानंतर दादाने पॉंटींगला निर्णय देण्याचे कान तुझे नाही तर पंचांचे आहे, असे सुनावले होते. त्याच्या व्यतिरिक्त अनिल कुंबळेनेही ''फक्त एकच संघ खिलाडू वृत्तीने खेळला अशा शब्दांत पॉंटींगला सुनावले होते. 

3. गौतम गंभीर आणि शेन वॉटसन यांच्यातील द्वंद
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परत आल्यावर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला. दिल्लीतील फिरोज शहा कोटला मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्या दरम्यान गंभीर आणि शेन वॉटसन यांच्यात चकमक झाली. गंभीर पहिली धाव काढण्यासाठी पळत असताना वॉटसनने त्याची स्लेजिंग केली. त्यामुळे गंभीर चांगलाच संतापला. दुसरी धाव काढताना त्याने चक्क वॉटसनला कोपरा मारला. त्याच्या या वर्तनामुळे त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. 

4. अन द्रविडने मैदान सोडण्यास दिला नकार
कर्णधार स्टिव्ह वॉच्या नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलग 15 कसोटी सामने जिंकले होते. मैदानावर खेळाबरोबरच त्यांनी प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण करण्याची एकही संधी सोडली नाही. 2001मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड फलंदाजी करताना मायकेल स्लॅटरने त्याता झेल पकडला. मात्र, त्याच्या झेलबद्दल शंका असल्याने द्रविडने मैदान सोडण्यास नकार दिला. त्यानंतर स्लॅटरने द्रविडला आक्षेपार्ह भाषेत बडबड केली होती. त्यानंतर स्लॅटरला दंड ठोठाविण्यात आला होता तसेच त्याला द्रविडची माफीदेखील मागावी लागली होती.

5. कर्णधार कोहलीचा तापटपणा
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये होणारे वाद हे काही नवीन नाहीत. मात्र खेळाडू आणि स्टेडियममधील प्रेक्षक यांच्यातील वाद ही काही क्रिकेटविश्वात वारंवार होणारी गोष्ट नाही. 2012 मध्ये झालेल्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर क्रिकेटविश्वाने भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांमधील वाद अनुभवला. स्टेडियममधील प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियन संघाचा विजयाचा आनंद व्यक्त करताना मर्यादा ओलांडत जल्लोष केला आणि कोहलीला शिवीगाळही केली. मुळातच आक्रमक स्वभावाच्या कोहलीने प्रेक्षकांनी आक्षेपार्ह हातवारे करत प्रत्युत्तर दिले. मात्र, या कृत्यामुळे त्याला सामन्याच्या 50% फी दंड म्हणून द्यावी लागली. कोहलीने आपली चूक मान्यकेली मात्र प्रेक्षकांनीही शिवीगाळ करणे योग्य नसल्याचे त्याने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com