esakal | IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी कोरोनाची वेगळी नियमावली?
sakal

बोलून बातमी शोधा

ravi shastri and virat kohli

IND vs ENG : शास्त्री-कोहली यांच्यासाठी कोरोनाची वेगळी नियमावली?

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय नोंदवला आहे. भारतीय संघाने या दिमाखदार विजयासह मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असताना आणखी एक मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह कर्णधार विराट कोहलीने कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याचे वृत्त समोर येत आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कसोटी मालिका संपल्यावर यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. कोरोनाच्या काळात 'बायो-बबल'च्या कवचात होणाऱ्या स्पर्धेवेळी खेळाडूंना कठोर नियामवलीतून जावे लागत आहे. यापूर्वी काही खेळाडूंवर तात्काळ कारवाई झाल्याचेही पाहायला मिळाले. मग शास्त्री-कोहलीसाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्नही या प्रकरणामुळे उपस्थिती झाला तर नवल वाटू नये.

हेही वाचा: 'बुमराहच्या वर्ल्ड क्लास रिव्हर्स स्विंगमुळं पडलो तोंडावर'

चौथ्या कसोटीच्या अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने (BCCI) मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली. सोमवारी बीसीसीआयने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचे स्पष्टीकरण दिले. रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांच्यासह फिजियोथेरेपिस्ट नितिन पटेल यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. शास्त्रींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 'बायो-बबल' वर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली मागील आठवड्यात एका कार्यक्रमाला उपस्थितीत राहिले होते. परवानगी न घेता कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल दोघांवर बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कोहली, शास्त्री यांच्यासह टीममधील काही सदस्य मागील आठवड्यात मंगळवारी एका पुस्तक प्रकाशन समारंभात सामील झाले होते. बीसीसीआयने यासाठी खेळाडूंना कोणतीही परवानगी दिली नव्हती. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाचे फोटो बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना शेअर करण्यात आले असून यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. ही घटना लाजीरवाणी असून कसोटी मालिका संपल्यानंतर खेळाडूंना याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागेल. या प्रकरणात टीम व्यवस्थापक गिरीश डोंगरे यांची भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात आले आहे.

loading image
go to top