esakal | भारतीय संघाची आजपर्यंतची समतोल कामगिरी : कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय संघाची आजपर्यंतची समतोल कामगिरी : कोहली

न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने आजपर्यंतचा आम्ही मिळविलेला एक समतोल विजय, असे याचे वर्णन करता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

भारतीय संघाची आजपर्यंतची समतोल कामगिरी : कोहली

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नेपियर (न्यूझीलंड) : न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळविल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने आजपर्यंतचा आम्ही मिळविलेला एक समतोल विजय, असे याचे वर्णन करता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

न्यूझीलंडचे 156 धावांचे आव्हान भारतीय संघाने अगदी सहज पेलले. कुलदीप यादव, महंमद शमी यांच्यानंतर शिखर धवनची कामगिरी निर्णायक ठरली. विराट कोहलीने देखील 45 धावांचे योगदान दिले. 

कोहली म्हणाला, "एक समतोल विजय असे आजच्या कामगिरीला म्हणता येईल. गोलंदाजीत यापेक्षा अधिक सरस कामगिरी असूच शकत नाही. नाणेफेक हरलो तेव्हा तीनशेहून अधिक धावांचा पाठलाग करावा लागणार असेच वाटले होते. पण, गोलंदाजांनी माझ्या मनातील आव्हानापेक्षा निम्म्यातच न्यूझीलंडला रोखले.'' 

शमी, कुलदीप आणि धवन यांच्याविषयी कोहली भरभरून बोलला. तो म्हणाला, "शमीच्या क्षमतेवर दाखवलेला विश्‍वास त्याने सार्थ ठरविला. सध्याची भारताची वेगवान गोलंदाजी कुठल्याही संघाला गुंडाळू शकते. फिरकी गोलंदाजांनी राखलेली लय त्यावर कळस करणारी होती. धवननेही एक महत्त्वाची खेळी खेळली. उन्हामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हाच तूच सामना संपवायला हवा, असे सांगितले होते. तो जेव्हा लयीमध्ये असतो, तेव्हा त्याला रोखणे कठीण असते.'' 

उन्हाच्या अडथळ्यामुळे विश्रांती घ्यावी लागणे हा अनुभव नवा होता. तो म्हणाला, "यापूर्वी पाऊस किंवा अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागण्याचा नियम होता. उन्हामुळे खेळ थांबविण्याचा नियम नव्हता. 2014 मध्ये अशा घटनेतच मी बाद झालो होतो.'' 

संघ सहकारी एकमेकांच्या यशाचा आनंद घेत आहेत, संघाच्या वाटचालीतील ही महत्त्वाची बाब आहे. दुखापतीच्या प्रदीर्घ आव्हानातून मी पुनरागमन केले आहे. साहजिकच आता सातत्य राखण्याचे आव्हान आहे. 
महंमद शमी, भारताचा वेगवान गोलंदाज 

loading image