गोपीचंद यांच्याबद्दल पदुकोण अकादमीस आदर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

मुंबई : प्रकाश सर, कधीही माझ्याबाबत का चांगले बोलले नाहीत, ही टिपण्णी पुल्लेला गोपीचंद यांनी त्यांच्या पुस्तकात केल्यानंतर पदुकोण यांनी थेट उत्तर देणे टाळले, पण त्याच वेळी प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीस गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनसाठी केलेल्या कामाबद्दल प्रचंड आदर असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : प्रकाश सर, कधीही माझ्याबाबत का चांगले बोलले नाहीत, ही टिपण्णी पुल्लेला गोपीचंद यांनी त्यांच्या पुस्तकात केल्यानंतर पदुकोण यांनी थेट उत्तर देणे टाळले, पण त्याच वेळी प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमीस गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनसाठी केलेल्या कामाबद्दल प्रचंड आदर असल्याचे म्हटले आहे.

साईना नेहवाल आपल्याला सोडून प्रकाश पदुकोण अकादमीत गेली याचा गोपीचंद यांना खूप त्रास झाला होता. त्यावेळी तिला रोखण्याचा प्रकाश सर (प्रकाश पदुकोण), विमल कुमार यांचे थेट नाव घेतले होते, पण आता पदुकोण अथवा विमल कुमार यांनी थेट उत्तर न देताना पदुकोण अकादमीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

गोपीचंद यांनी खेळाडू तसेच मार्गदर्शक म्हणून भारतीय बॅडमिंटनसाठी खूप काही दिले आहे. त्याबद्दल आम्हाला आदरच आहे. त्यांच्या शिष्यांनी जागतिक स्तरावर चांगली कामगिरी केली आहे, त्याबद्दल आम्हाला त्यांचे कौतुकच आहे. त्यांच्याबरोबर आमचे कायम सौहार्दाचे संबंध आहेत, असेही अकादमीने म्हटले आहे.

पदुकोण अकादमीत मार्गदर्शन घेण्याचा निर्णय साईनाचाच होता. तिनेच बंगळूरला विमल कुमार यांचे मार्गदर्शन घेण्याचे ठरवले होते. साईनाची कारकीर्दीतील घसरण रोखतानाच विमल कुमार यांनी साईनाला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले, तसेच बंगळूरमध्ये असताना तिने ऑल इंग्लंड आणि जागतिक स्पर्धेत रौप्य जिंकले होते, असेही पत्रकात म्हटले आहे.

पदुकोण अकादमीत अनेक खेळाडू सुरुवातीस शिकतात आणि अन्यत्र जातात. त्यांना आम्ही कधी रोखले नाही. खेळाडू कारकीर्दीत पूर्ण बहरात असण्याचा कालावधी खूपच कमी असतो. त्या कालावधीचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा हा निर्णय खेळाडूचाच आहे, असेही आम्ही मानतो, असेही पत्रकात म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we repect gopichand, say prakash padukone acadamy