डेव्हिस लढत त्रयस्थ ठिकाणी घेण्याच्या मागणीची गरजच काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची लढत भारतास त्रयस्थ ठिकाणी हवी असेल, तर त्यासंदर्भातची विनंती करताना कारणेही स्पष्ट करावीत, असे पत्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस महासंघास लिहिले आहे. त्यावर भारताने त्रयस्थ ठिकाणच्या लढतीबाबतचा अधिकार आपलाच आहे, त्यासाठी आम्ही विनंती कशाला करायला हवी अशी विचारणा केली आहे.

नवी दिल्ली / मुंबई : डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची लढत भारतास त्रयस्थ ठिकाणी हवी असेल, तर त्यासंदर्भातची विनंती करताना कारणेही स्पष्ट करावीत, असे पत्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारतीय टेनिस महासंघास लिहिले आहे. त्यावर भारताने त्रयस्थ ठिकाणच्या लढतीबाबतचा अधिकार आपलाच आहे, त्यासाठी आम्ही विनंती कशाला करायला हवी अशी विचारणा केली आहे.

भारतीय टेनिस संघटनेने आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघास लिहिलेल्या पत्रात महासंघाने गेल्या काही दिवसातील महत्त्वाच्या आठ घडामोडींची दखल घ्यावी याकडे लक्ष वेधले आहे. त्यात भारतीय राजदूतास पाकिस्तान सोडण्यास सांगणे, दोन्ही देशांना जोडणारी रेल्वे तसेच बस वाहतूक बंद करणे, भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद करणे तसेच पाकिस्तानातील वाढता तणाव याकडे लक्ष वेधले आहे.

भारतीय संघटनेने आंतरराष्ट्रीय महासंघास सुरक्षा अहवाल देण्यास सांगितले. तसेच यासंदर्भात 16 ऑगस्टला चर्चा करण्याचीही सूचना केली आहे. त्याचबरोबर तुम्ही सुरक्षा व्यवस्थेबाबत समाधानी असाल आणि आम्ही लढतीचे ठिकाण बदलण्याची विनंती केली, तर तुम्ही ती मान्य करणार नाही. आता तुम्हीच सुरक्षेबाबत समाधानी नसाल तर लढतीचे ठिकाण बदलण्याचा तुम्हालाच अधिकार आहे, असेही भारतीय संघटनेचे सचिव हिरोण्मय चॅटर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय महासंघाने भारतीय टेनिस संघटनेने अद्यापही व्हिसासाठी अर्ज का केला नाही, याची विचारणा केली आहे. व्हिसासाठी पुरेसा वेळ ठेवून अर्ज करण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे तातडीने यासाठी अर्ज करा, अशी सूचना केली आहे. त्याचबरोबर ऑलिंपिक चळवळीचे पालन करण्याची सूचना तुम्हाला भारत सरकारने केली आहे, त्याचेही स्पष्टीकरण करावे; अशीही सूचना केली आहे.

पाकिस्तान टेनिस महासंघाकडे आम्ही सुरक्षेच्या उपायांची माहिती मागितली आहे, ती मिळाल्यावर आपणास देण्यात येईल; असे सांगताना मात्र यामुळे लढत खेळण्याबाबतची प्रक्रिया थांबवू नये असेही सांगितले आहे.

डेव्हिस करंडक लढत त्रयस्थ ठिकाणी हवी असे आपल्याला वाटत असेल, तर त्याबाबतची कारणे आम्हाला स्पष्ट करावीत; आम्ही ती डेव्हिस कप समितीस विचारार्थ सुपूर्त करू, असे आंतरराष्ट्रीय महासंघाने पत्रात म्हटले होते. त्यास भारताने उत्तरही दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why should we ask for natural venue, AITA asked ITF