पार्थिव पटेल 'Stumped', क्रिकेटला केला अलविदा

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 9 December 2020

पार्थिवने जेव्हा टीम इंडियाकडून पहिला सामना खेळला तेव्हा तो केवळ 17 वर्षे 153 दिवसांचा होता. भारताचा तो सर्वांत युवा विकेटकीपर ठरला होता.

नवी दिल्ली- वयाच्या 17 व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या विकेटकीपर बॅट्समन पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पार्थिवने जेव्हा टीम इंडियाकडून पहिला सामना खेळला तेव्हा तो केवळ 17 वर्षे 153 दिवसांचा होता. भारताचा तो सर्वांत युवा विकेटकीपर ठरला होता. 35 वर्षीय पार्थिवने भारताकडून 25 कसोटी, 38 वनडे आंतरराष्ट्रीय सामने आणि दोन टी-20 सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गुजरातचे प्रतिनिधीत्व करताना 194 सामने खेळले आहेत. 

त्याने 2002 मध्ये आपल्या पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु, दिनेश कार्तिक आणि धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकटेमधील पदार्पणानंतर पार्थिव पटेल टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसला. तो गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. 

पार्थिव पटेल आयपीएलमध्येही विविध संघांकडून खेळला आहे. यंदाच्या वर्षी दुबई येथे खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये तो विरोट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली बंगळुरु टीमचा हिस्सा होता. गेल्या काही वर्षांपासून तो समालोचन करतानाही दिसत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या योजनेबद्दल त्याने अद्याप काहीच जाहीर केलेले नाही. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक नाही

पार्थिव पटेलने आपल्या करिअर 25 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 31.13 च्या सरासरीने 934 धावा केल्या. याचदरम्यान, त्याच्या नावार 6 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या ही 71 होती. त्याने 38 एकदिवसीय सामने खेळले. यादरम्यान त्याने 34 डावांत 23.74 च्या सरासरीने 736 धावा केल्या. 95 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. त्याने 2 टी 20 सामन्यांत त्याने एकूण 36 धावा केल्या. 

वर्ष 2018 मध्ये खेळला होता अखेरचा सामना

टीम इंडियाकडून त्याने अखेरचा सामना 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात जोहान्सबर्गमध्ये खेळला होता. त्याने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे 2012 मध्ये श्रीलंकेविरोधात ब्रिस्बेनमध्ये आणि अखेरचा टी-20 सामना इंग्लंडविरोधात मँचेस्टरमध्ये 2011 मध्ये खेळला होता. पार्थिवला आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये एकही शतक करता आलेले नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wicket keeper Parthiv Patel announces retirement from all forms of cricket