Will Smeed : विल स्मीडने 'द हंड्रेड' स्पर्धेत ठोकले पहिले शतक; रचला इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Will Smeed Hit First Century In The Hundred Tournament

Will Smeed : विल स्मीडने 'द हंड्रेड' स्पर्धेत ठोकले पहिले शतक; रचला इतिहास

Will Smeed The Hundred: इंग्लंडला सध्या द हंड्रेड स्पर्धेचा फिव्हर चढला आहे. 100 चेंडूंच्या या स्पर्धेत दोन्ही संघ प्रत्येकी 100 100 चेंडू खेळतात. हा क्रिकेट फॉरमॅट टी 20 आणि टी 10 यांच्या मधला फॉरमॅट आहे. या क्रिकेट फॉरमॅटमध्ये शतक ठोकणे सहज शक्य नाही. इंग्लंडचे जोस बटलर, लियाम लिव्हिंगस्टोन, जॉनी बेअरस्टो, मोईन अली असे तगडे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत मात्र या पैकी एकालाही शतक ठोकता आले नाही. मात्र ही ऐतिहासिक कामगिरी 20 वर्षाच्या विल स्मीड (Will Smeed) ने केली. (The Hundred Tournament First Century)

इंग्लिश क्रिकेटर विड स्मीडने बुधवारी खेळल्या गेलेल्या द हंड्रेड स्पर्धेतील एका सामन्यात नाबाद शतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. याचबरोबर तो द हंड्रेड स्पर्धेत शतक ठोकणारा पहिला फलंदाज देखील ठरला. हा सामना बर्मिंगहम फिनिक्स आणि सदर्न ब्रेव यांच्यामध्ये खेळला गेला. फिनिक्सने हा सामना 53 धावांनी जिंकला.

फिनिक्सकडून खेळणाऱ्या स्मीडने सलामीला येत 50 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 8 चौकार लगावले. या खेळीदरम्यान स्मीडचा स्ट्राईक रेट हा 202 इतका होता.

दरम्यान, विल स्मीडच्या या दमदार खेळीच्या जोरावर फिनिक्सने 4 बाद 176 धावा केल्या. मोईन अली फिनिक्स संघाचा कर्णधार आहे. या संघात लियाम लिव्हिंगस्टोन आणि मॅथ्यू वेड सारखे टी 20 स्टार खेळाडू देखील आहे. तरी देखील स्मीड द हंड्रेड स्पर्धेत पहिले शतक ठोकण्याचा मान पटकावला.

फिनिक्सने ठेवलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सदर्न ब्रेव्हचा संपूर्ण संघ 85 चेंडूत 123 धावात ढेर झाला. फिनिक्सकडून वेगवान गोलंदाज बेन्री ब्रुक्सने 25 धावा देत 5 विकेट घेतल्या.

टॅग्स :CricketEngland Cricket