esakal | महिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस 
sakal

बोलून बातमी शोधा

Women's hockey team better than men's

महिला हॉकी संघ पुरुषांपेक्षा सरस 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जाकार्ता : यजमान इंडोनेशियाला दया दाखवलेल्या भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा हॉकी स्पर्धेत कझाकस्तानला कोणतीही दयामाया दाखवली नाही. त्यांनी आपल्या पुरुष संघाला हम भी कुछ कम नहीं, असेच दाखवून दिले. भारतीय पुरुषांनी इंडोनेशियाला 17-0 हरवत विक्रम केला होता, तर महिलांनी त्यापेक्षा सरस ठरताना कझाकस्तानचा 21-0 फडशा पाडला. 

आशियाई क्रीडा स्पर्धेतील एका सामन्यात सर्वाधिक 17 गोलचा विक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. तो सहज मागे टाकताना महिलांनी बॉक्‍सिंगमध्ये ताकद असलेल्या कझाकस्तानची जणू पंचिंग बॅगच केली. विश्रांतीपूर्वीच्या दोन सत्रांत भारतीयांनी नऊ गोल केले होते. त्यानंतर आक्रमणाचा धडाका वाढवला. त्यानंतर प्रत्येकी 15 मिनिटांच्या तिसऱ्या सत्रात 7 आणि चौथ्या सत्रात 5 गोल करीत कझाकस्तानला कसलीही संधी दिली नाही. 

भारताकडून गुरजित कौरने 4, वंदना कटारिया, नवनीत कौर, लालरेमसियामाने प्रत्येकी 3, तर नवज्योत कौर, लिलिमा मिंझने प्रत्येकी 2 आणि दीप ग्रेस एक्का, मोनिका, नेहा गोयल, उदिताने प्रत्येकी 1 गोल करीत भारताचा दणदणीत विजय साकारला. हॉकी सांख्यिकीतज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी लगेच हा सर्वांत मोठा विजय नसल्याची आठवण करून देताना 1982 च्या स्पर्धेत भारतीय महिलांनी हॉंगकॉंगविरुद्ध 22-0 बाजी मारली होती, याची आठवण करून दिली. 

भारतीय महिलांचे गोलचे प्रमाण 44 टक्के (48 शॉट्‌सवर 21) असे प्रभावी होते. 15 मैदानी गोलना (31 शॉट्‌स) पेनल्टी कॉर्नरवरील 5 (प्राप्त 16) आणि एका पेनल्टी स्ट्रोकच्या गोलची साथ लाभली. पेनल्टी कॉर्नरवर जास्त गोल झाले नाहीत, याची दखल भारतीय संघव्यवस्थापन नक्कीच घेईल. 

loading image
go to top