
WPL 2023: क्रिकेटच्या मैदानावर लेडी मायकल जॅक्सन, दिल्ली कॅपिटलच्या खेळाडूचे जबरदस्त डान्स मुव्ह
भारतीय महिला क्रिकेटर जेमिमाह रॉड्रिग्जची बोल्ड स्टाइल सर्वांनाच माहीती आहे. क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त जेमिमाह गाते आणि गिटार वाजवते. ती सध्या महिला प्रीमियर लीग २०२३ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सने महिला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (DC विरुद्ध RCB)चा पराभव करून विजय मिळवुन सुरुवात केली. या मॅचमध्ये जेमिमाह मैदानावर नाचताना दिसली. जेमिमाहचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाचा ६० धावांनी पराभव केला. वास्तविक, जेमिमाचा हा व्हिडिओ त्यावेळचा आहे जेव्हा दिल्ली कॅपिटल्स संघ विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यानंतर अचानक सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेमिमाहने प्रेक्षकांकडे तोंड करून आपल्या डान्स मूव्ह करण्यास सुरुवात केली. जेमिमाहच्या याही कलेला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली आहे.
सामन्यानंतर जेमिमाहनेही हा व्हिडिओ रिट्विट केला आणि कॅप्शन दिले, 'फुल मजा' काही दिवसांपूर्वी जेमिमाहने आयुष्मान खुरानाच्या भावासोबत एक गाणंदेखील रेकॉर्ड केलं होतं जे सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्यावर ती सहकारी खेळाडूंमध्ये गिटार वाजवताना दिसुन आली होती.
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जेमिमाहने 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 22 धावा केल्या. सलामीवीर शेफाली वर्माने 45 चेंडूत 84 धावा केल्या तर मेग लॅनिंगने 72 धावांचे योगदान दिले. दिल्ली कॅपिटल्सने 2 बाद 223 धावा केल्या. तर आरसीबी संघ 8 विकेट्सवर केवळ 163 धावाच करू शकला.