World Cup : 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नाही तर एका चाहत्याने बक्कळ पैसे कमवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 1983

World Cup : 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने नाही तर एका चाहत्याने बक्कळ पैसे कमवले

World Cup 1983 : इंग्लंडमध्ये झालेल्या 1983 च्या वर्ल्डकप स्पर्धेच्या कहाण्या अनेक आहेत. त्याकाळात भारतीय संघाचे चाहते खूप होते; पण पाठीराखे कमी होते. कारण, भारतीय संघ त्या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी कोणाला आशा वाटत नव्हती. भारताच्या प्रत्येक सामन्याला गर्दी होत होती ती संघ लढत देतो का नाही, हे पाहायला. त्या चाहत्यात एक सच्चा पाठीराखा असा होता जो सरदार होता.

इंग्लंडमध्ये क्रिकेट सामन्यावर सट्टा लावायला अधिकृत परवानगी असल्याने या सरदारजीने पहिल्या सामन्यात मोठे धैर्य करून भारतीय संघावर २० पौंडचा सट्टा लावला. भारताचा पहिला सामना गतविजेत्या वेस्ट इंडीज संघासोबत असल्याने सरदारजींना चांगला दहापट भाव त्यांच्या पैजेला मिळाला. ९ जून १९८३ रोजी झालेल्या सामन्यातः भारतीय संघाने चांगली फलंदाजी करून २६२ धावा उभारल्या आणि वेस्ट इंडीजला चक्क २२८ धावांत गुंडाळले. सरदारजींना २० पौंडच्या पैजेचे चांगले २०० पौंड मिळाले.

त्या चाहत्याने २० पौंड काढून घेतले आणि १८० पौंडची परत पैज लावली. पुढचा सामना झिंबाब्वेविरुद्ध असल्याने जास्त पैज लागली नाही. अगदी माफक फायदा झाला. पुढील दोन सामन्यांत त्यांना तोटा झाला कारण वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियासमोरचे सामने मोठ्या फरकाने भारताने गमावले. गेलेली लय थोडी परत आली जेव्हा कपिलदेवने झिंबाब्वे समोरचा सामना अजरामर शतकी खेळी करून जिंकून दिला.

कसेबसे करत भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला जिथे त्यांचा सामना यजमान इंग्लंडसमोर होता. सरदारजींनी परत एकदा हिंमत करून मोठे पैसे लावले. भारताने सर्वांत जबरदस्त क्रिकेट खेळत यजमान संघाला आरामात पराभूत केले. सरदारजींचे मित्र सांगत होते, 'बस झाली नशिवाची परीक्षा... मस्त पैसे मिळाले आहेत आता पैज लावू नकोस कारण अंतिम सामन्यात भारतीय संघाची डाळ वेस्ट इंडीजसमोर अजिबात शिजणार नाही... भावनेच्या भरात पैज लावलीत तर हाती आलेला पैसा 'वाहून जाईल', सरदारजींचा विचार वेगळा होता.

अंतिम सामन्याअगोदर त्यांनी गुंतवलेली मूळ रक्कम काढून घेऊन उरलेले सर्व पैसे सरदारजींनी पैजेला लावले की अंतिम सामनाही भारतीय संघच जिंकणार. अंतिम सामन्यात भारतीय संघाने चमत्कार केला. बलाढ्य विंडीज संघाचा पराभव करताना कपिलदेवच्या संघाने जेमतेम १८३ धावांची राखण केली. वेस्ट इंडीजचा डाव १४० धावांवर संपला तेव्हा भारतीय संघ झाला असेल इतकाच बेभान आनंद सरदारजींना झाला. हा आनंद दुहेरी होता.

ज्या संघावर जीव लावला, त्यांनी वर्ल्डकप जिंकला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबरदस्त आर्थिक फायदा पैज जिंकण्याचा सरदारजींना झाला होता. सरदारजी असे दिलदार त्यांनी परत फक्त मूळ रक्कम काढून घेतली आणि उरलेल्या पैशांची अगदी स्वतः ढोल वाजवत आणि भांगडा करत भारतीय संघाला पार्टी दिली, याला म्हणतात हिंमत आणि याला म्हणतात मोठे मन!

(Sports Latest News)