World Cup 2019 : पाकिस्तानसमोर बांगलादेशचे अशक्यप्राय आव्हान!

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 5 July 2019

पाकिस्तानसाठी 1992च्या स्पर्धेप्रमाणे काही जुळून येईल याची शक्‍यता खूप दूर राहिली आहे. पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास हा यश अपयशाचे हेलकावे खात झाला आहे. बांगलादेश संघाची कामगिरी मात्र नक्कीच प्रेरक राहिली आहे.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : क्रिकेटची पंढरी समजली जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर आज (शुक्रवार) विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील हातघाईची लढाई पहायला मिळणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पाकिस्तानला प्रतिस्पर्धी बांगलादेशवर विजय अपेक्षित आहे. नुसता विजय नाही, तर भला मोठा विजयच त्यांना उपांत्य फेरीत घेऊन जाणार आहे. पाकिस्तानसमोर हे अशक्‍यप्राय आव्हान आहे. ते त्यांनी शक्‍य करून दाखवल्यास विश्‍वकरंडक स्पर्धेचा इतिहासच बदलला जाणार आहे. कारण इतका मोठा विजय कधीच साकार झालेला नाही. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी अखेरचे दोन सामने जिंकणे आवश्‍यक होते. पण, त्याचवेळी अन्य संघांच्या कामगिरीवर देखील त्यांना लक्ष द्यावे लागणार होते. यात भारताचा इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्याने त्यांचे आव्हान कठिण झाले. त्यात इंग्लंडने न्यूझीलंडवरही विजय मिळविल्याने पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा दरवाजा पूर्ण बंद झाला. पाकिस्तानसाठी नुसत्या विजयाने हा दरवाजा उघडणार नाही. तर, त्यांना तो अक्षरशः तोडावा लागणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्व विक्रमांची तोडफोड करूनच त्यांना उपांत्य फेरीचा दरवाजा उघडता येईल. 

पाकिस्तानला हा सामना प्रथम फलंदाजी केल्यानंतर किमान तीनशेहून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना बांगलादेशाचा डाव नव्वदीच्या आत गुंडाळावा लागेल. पण, यदाकदाचित बांगलादेश कर्णधार मश्रफी मोर्तझा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी घेतली, तर पाकिस्तान एकही चेंडू न खेळता स्पर्धेच्या बाहेर जाईल. एकूणच हे सगळे समीकरण न सुटण्यासारखेच आहे. 

पाकिस्तानसाठी 1992च्या स्पर्धेप्रमाणे काही जुळून येईल याची शक्‍यता खूप दूर राहिली आहे. पाकिस्तानचा स्पर्धेतील प्रवास हा यश अपयशाचे हेलकावे खात झाला आहे. बांगलादेश संघाची कामगिरी मात्र नक्कीच प्रेरक राहिली आहे. बांगलादेशसाठी शकिब अल हसन याने एक क्रिकेटपटू म्हणून जे मैदानात करायला हवे ते सगळे केले. त्याच्याच सातत्यपूर्ण कामगिरीच्या लाटेवर बांगलादेश संघ स्पर्धेत तरून गेला. तुल्यबळ संघांसमोरही बांगलादेश आव्हान उभे करू शकला.

दुसरे महत्वाचे म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये मैदानाबाहेर असलेली वेगळीच खुन्नस लक्षात घेता बांगलादेश संघ उपांत्य फेरीच्या दडपणाखाली आलेल्या पाकिस्तान संघावर घाव घालण्याची संधी सोडणार नाही हे देखील तितकेच खरे. एकूणच पाकिस्तान संघासाठी उद्या लॉर्डसच्या मैदानावर काही तरी जादू घडली तरच त्यांचा निभाव लागणार आहे. 

पाकिस्तानसमोर असे असेल आव्हान 
- प्रथम फलंदाजी करताना 308 धावा करणे आणि बांगलादेशावर 308 धावांनी विजय मिळविले 
- 350 धावा केल्यास बांगलादेशावर 312 धावांनी विजय अपेक्षित 
- 400 धावा केल्यास बांगलादेशावर 316 धावांची विजय आवश्‍यक 
- 450 धावा केल्यास बांगलादेशवरील विजयाधिक्‍य असेल 321 धावांचे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 Pakistan Bangladesh fights in World Cup today