
World Women Boxing : नीतू, प्रीती, मंजू उपउपांत्यपूर्व फेरीत
नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची प्रगती कायम राहिली आहे. आज आणखी तिघींनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती नीतू गंघास (४८ किलो) हिने कोरियाच्या डोयोन कांगचा पराभव करून शानदार सुरुवात केली. ५४ किलो गटात प्रीतीने रुमानियाच्या लाक्रामिओरा प्रीजोकवर ४-३ असा विजय मिळवला; तर मंजू बंबोरिया (६६ किलो) हिने न्यूझीलंडच्या कॅरा व्हेरेओचा ५-० असा धुव्वा उडवला.
गतवेळच्या या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीतूचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले होते. यंदा मात्र धडाक्यात सुरवात करताना तिने प्रतिस्पर्ध्यावर अवघ्या १११ सेकंदात विजय मिळवला. लढतीस सुरुवात झाल्यानंतर नीतूने हूक आणि तिरसक पंच मारण्यास प्रारंभ केला; परंतु हे फटके योग्य ठिकाणी लागत नव्हते. नीतूने आपला पवित्रा लगेचच बदलला आणि दोन्ही हातांनी पंचचा हल्लाबोल सुरू केला. नीतूच्या या प्रहारापुढे हतबल झालेल्या डोयोनने हार स्वीकारली.
प्रीतीला मात्र स्पर्धेतील आपल्या विजयासाठी शर्थ करावी लागली. प्रीजोक आणि प्रीती यांनी सुरुवातीला काही अंतरावर रहाणे पसंत केले; परंतु लगेचच प्रीजोकने दोन पंच प्रीतीच्या चेहऱ्यावर मारले. मात्र प्रीतीने याची परतफेड लगेचच केली आणि दोन ताकवान पंच देत पहिल्या राऊंडमध्ये ३-२ अशी आघाडी घेती.
दुसऱ्या राऊंडमध्ये प्रीजोकने प्रीतीच्या शरीरावर पंच मारा करण्यास सुरवात केली. प्रीतने रिंगमध्ये फिरत हे हल्ले चुकवले आणि संधी मिळताच स्वतः अचूक पंच मारले आणि तेच तिच्या विजयात मोलाचे ठरले.