
WTC : रोहितचं कौतुक करुन माजी इंग्लिश क्रिकेटर झाला ट्रोल!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाच्या डावाला सुरुवात केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यावेळी कॉमेंट्री बॉक्समधून माजी इंग्लिश क्रिकेटर नासिर हुसेन याने रोहितवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्मा पुल शॉट पाहण्यासारखा असतो. क्रिकेट जगातत सर्वाधिक उत्तम पुल शॉट हा हिटमॅनचा असतो, अशा शब्दांत नासिर हुसेन हे रोहितच्या फटकेबाजीच कौतुक करताना पाहयला मिळाले. यावेळी त्यांची साथ देण्यासाठी बसलेल्या दिनेश कार्तिकने नासिर हुसेन यांचीच शाळा घेतली. दिनेश कार्तिकने रोहितचा पुल शॉट बेस्ट असल्याचे मान्य करत नासिर हुसेन यांचा हा शॉट जमत नव्हता, असा टोला हणला. त्यामुळे नासिर हुसेन यांची चांगलीच फजिती झाली.
इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसने कॉमेंट्री दरम्यान म्हणाले की, पुल शॉट खेळण्यामध्ये क्रिकेट जगतात रोहित शर्मा सर्वांत भारी फलंदाज आहे. अगदी तुझ्यापेक्षा उलट झलक रोहित शर्मामध्ये दिसते, असे म्हणत दिनेश कार्तिकने नासिर हुसेनला ट्रोल केले. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा खेळ रंगल्याचे पाहायला मिळत आहे. नेटकरी मजेदार मीम्स शेअर करत नासिर हुसेन रोहितचे कौतुक करुन फसल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया देत आहेत. WTC 2021 च्या फायनलमध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून दिनेश कार्तिकने मास्टर स्ट्रोक खेळला, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या मेगा फायनलमध्ये रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्याने चांगली सुरुवात करुन मोठी इंनिंग खेळण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. पण जेमिसनने साउदीकरवी त्याला झेलबाद करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहित शर्माने 68 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत 34 धावांची भर घातली. त्याच्यापाठोपाठ शुभमन गिलनेही मैदान सोडले. भारतीय संघाने लंचपूर्वी सलामीवीरांच्या रुपात दोन विकेट गमावल्या. मध्यफळीतील चेतेश्वर पुजाराही स्वस्तात माघारी फिरला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि अंजिक्य रहाणे यांच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी येऊन पडली.