Pro Kabaddi 2019 : यूपीकडून बंगालचा पराभव 

UP Yoddha beat Bengal Warriors
UP Yoddha beat Bengal Warriors

प्रो-कबड्डी 
बंगळूर - श्रीकांत जाधवच्या चढायांना बचाव फळीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे यूपी योद्धाज संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील बंगळूरच्या टप्प्यात रविवारी बंगाल वॉरियर्सला 32-29 असे हरविले. 

या विजयाने यूपीने जरूर आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला असला, तरी पराभवामुळे बंगाल वॉरियर्सच्या पुढील प्रवासाच्या अडचणी वाढणार आहेत. यूपी संघाच्या श्रीकांत जाधव आणि नीतेश कुमार या चढाईपटूंनी गुणांची जबाबदारी घेतल्यावर त्यांच्या बचावपटूंनी बंगालच्या प्रपंजन आणि मनिंदरसिंग या प्रमुख चढाईपटूंना जखडून ठेवण्याचे काम चोख बजावले. यामुळे यूपी संघाला सामन्यात एक पाऊल पुढे राहणे शक्‍य झाले. बंगालकडून आज बलदेवसिंगच्या चढायांचे समाधान लाभले. 

सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला एकवेळ यूपी 31-28, 31-29 असे आघाडीवर होते. अखेरच्या चढाईत युपीची थर्ड रेड असताना बंगालकडे केवळ दोनच खेळाडू होते. श्रीकांत जाधवने या वेळी खोलवर चढाई करण्याचे धाडस दाखवून बंगालच्या बचावपटूंना आव्हान दिले आणि याच आव्हानात बंगालच्या रिंकू नरवालला श्रीकांतची पकड करण्याची घाई महागात पडली. त्यामुळे सुपर टॅकलचे दोन गुण मिळवून सामना बरोबरीत आणण्याची संधी त्यांनी गमावली आणि त्यांच्यावर पराभवाची नामुष्की आली. 

 बंगळूरचा विजय 
घरच्या मैदानावरील अपयशाचा फेरा बंगळूर बुल्स संघाने दुसऱ्याच सामन्यात संपुष्टात आणला. त्यांनी आज झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाजचा 33-27 असा पराभव केला. 

पवनकुमारच्या तुफानी चढायातील 17 गुण आणि अमित शेरॉनने केलेले "हाय फाइव्ह' त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. मध्यंतराला बंगळूरकडे 14-13 अशी एकाच गुणाची आघाडी होती. मात्र, हा फरक तमिळच्या राहुल चौधरी, मनजित चिल्लर, अजय ठाकूर यांना पार करता आला नाही. बंगळूरच्या बचावासमोर राहुल, अजय निष्प्रभ ठरले; तर पवनच्या चढायांनी त्याचा बचाव खिळखिळा केला. बचावात 12-8 हे राखलेले वर्चस्व तमिळला चढायात जमले नाही. ते या आघाडीवर बंगळूरपेक्षा 22-14 असे खूपच मागे राहिले आणि हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com