esakal | IND vs ENG : टीम इंडियाच्या विजयामागची पाच कारणं...
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs ENG

IND vs ENG : टीम इंडियाच्या विजयामागची पाच कारणं...

sakal_logo
By
सुशांत जाधव

England vs India : ओव्हलच्या मैदानात टीम इंडियाने दमदार कमबॅक करत दिमाखदार विजय नोंदवला. पिछाडीवरुन मिळवलेल्या या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवानंतर यजमान इंग्लंडला मालिका विजयाची भिती निर्माण झाली आहे. चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाला नावाला साजेसा खेळ करता आला नाही. पण दुसऱ्या डावात त्यांनी त्याची पूरेपूर वसुली केली. 450+ धावा करुन इंग्लंडसमोर डोंगराएवढे लक्ष्य ठेवले. ते भेदण्यात इंग्लंडला अपयश आले. जाणून घेऊयात भारताच्या दमदार कमबॅक विजयामागची पाच कारणे...

हिटमॅनची सुपर हिट शतकी खेळी

पहिल्या डावानंतर इंग्लंडने 99 धावांची आघाडी घेतली होती. सहाजिकच टीम इंडियावर याचे थोडे का होईना दडपण होतेच. पण रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने मजबूत स्थितीत वाटत असलेल्या गोलंदाजांचे खांदे पाडले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 83 धावांची खेळी केली. लोकेश राहुल अर्धशतकाला मुकल्यानंतर रोहित शर्माने परदेशातील पहिले शतक पूर्ण केले. या शतकामुळे टीम इंडियाला नुसता दिलासा मिळाला नाही तर बळ दुप्पट झाले.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडला लगाम; टीम इंडियानं वसूल केला 'लगान'

रोहित-पुजाराची भागीदारी

लोकेश राहुलने साथ सोडल्यानंतर रोहितनं पुजारासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या जोडीनं तिसऱ्या दुसऱ्या विकेटसाठी तब्बल 163 धावा जोडल्या. या भागीदारीत एक वेगळेपण ही पाहायला मिळाला. पुजारा रोहितच्या अंदाजात खेळताना दिसले तर रोहित पुजाराच्या मोडमध्ये गेला. दोन्ही फलंदाजांनी आपापली शैली बदलून केलेली खेळी टीम इंडियाच्या फायद्याची ठरली.

शार्दूल-पंतचा धमाका

इंग्लंड दौऱ्यावर चौथ्या कसोटीत पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेल्या शार्दूल ठाकूरनं लक्षवेधी कामगिरी केली. त्याने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही अर्धशतकी खेळी केली. त्याला पंतची सुरेख साथ मिळाली. या जोडीनं सातव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाला 400 पार मजल अगदी सहज मारता आली.

हेही वाचा: Video: भन्नाट स्पिन! चेंडू स्टंपच्या बाहेरून आत वळला अन्...

जाडेजाची फिरकी

चौथ्या कसोटीत रविंद्र जाडेजाला संधी दिल्यामुळे विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत होते. अश्विनला बाहेर बसवण्याची चूक टीम इंडियाला चांगली महागात पडणार असेही बोलले गेले. मात्र मोक्याच्या क्षणी महत्त्वाच्या विकेट घेऊन जाडेजाने या चर्चा फोल असल्याचे दाखवून दिले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात त्याने सेट झालेल्या हसीब हमीद याला बाद केले. हा मॅचचा दुसरा टर्निंग पाँइट होता. यापूर्वी शार्दूलनं सलामीवीर बर्न्सला बाद करुन इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते.

जलदगती गोलंदाजीतील धार

शार्दूल ठाकूरनंतर जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीतील धार दाखवून दिली. इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजीत उमेश यादवने आपल्यातील भेदक मारा दाखवून देत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. बुमराह, शार्दूल यांनी घेतलेल्या प्रत्येकी 2-2 विकेट आणि उमेश यादवच्या 3 विकेटमुळे इंग्लंड हतबल झाले.

loading image
go to top