काय सांगता काय, युवराजच्या संघाला पैसेच मिळालेले नाहीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

युवराजचा टोरोंटो नॅशनल्स संघ बुधवारी माँट्रीयल टायगर्सविरुद्ध खेळणार होता, पण दोन्ही संघांमधील खेळाडूंनी करारानुसार फ्रँचायजीकडून येणे असलेली रक्कम मिळाली नाही म्हणून मैदानावर जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास नकार दिला.

टोरंटो : कॅनडातील टी20 लिगमधील काही संघांमधील खेळाडूंना पैसेच मिळाले नसल्याची खबर आहे. यात भारताचा वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग याच्या संघाचाही समावेश आहे. पाकिस्तानचा कसोटीपटू उमर अकमल याने मॅचफिक्सिंगच्या उद्देशाने संपर्क साधण्यात आल्याचा दावा केल्यामुळे आधीच खळबळ उडाली होती. त्यातच हे वृत्त येऊन थडकल्यामुळे गदारोळ माजला आहे.

पाकिस्तानच्या खेळाडूनेच दिली मला फिक्सिंगची ऑफर; अकमलचा खुलासा

युवराजचा टोरोंटो नॅशनल्स संघ बुधवारी माँट्रीयल टायगर्सविरुद्ध खेळणार होता, पण दोन्ही संघांमधील खेळाडूंनी करारानुसार फ्रँचायजीकडून येणे असलेली रक्कम मिळाली नाही म्हणून मैदानावर जाणाऱ्या बसमध्ये बसण्यास नकार दिला. अखेरीस ते तयार झाले. शेवटी सामना दोन तास उशीरा सुरू झाला. युवराज पाठीच्या दुखापतीमुळे खेळला नाही. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याच्या संघावर टोरोंटोने 35 धावांनी मात केली.

नियोजित वेळेनुसार सामना सुरु झाला नाही, त्यावेळी तांत्रिक कारणामुळे उशीर होत असल्याचे संयोजकांतर्फे सांगितले जात होते. तसे ट्वीट केले जात होते. थेट प्रक्षेपण होणाऱ्या टीव्ही चॅनेलवरही हाच संदेश येत होता.

दरम्यान, इएसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळाने जीटी20 लिग असे नाव असलेल्या स्पर्धेतील बहुतांश खेळाडूंना पैसे मिळालेले नाहीत असे वृत्त दिले. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार एका खेळाडूने सांगितले की, हा मुद्दा प्रक्रियेसंदर्भात होता, पण तिन्ही घटकांशी चर्चा झाल्यानंतर त्यातून मार्ग निघाला. आता सामना सुरु होईल.

पत्रकार पीटर डेल पेन्ना यांचे यासंदर्भातील ट्वीट थोड्याच वेळात व्हायरल झाले. सामन्याच्या आधीपासून खेळाडू मैदानावर आले नव्हते. साधारणपणे किमान सव्वा तास आधी संघ दाखल होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuvraj Singh Led Toronto Nationals Game Against Montreal Tigers Delayed Due To Payment Issue