रॉकेलचा स्टोव्ह होत आहे इतिहासजमा

श्रीनिवास दुध्याल
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

स्टोव्हची गरज आजही गरिबांसह शहरात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांना आहे. त्यांच्याकडून स्टोव्हमध्ये रॉकेलऐवजी डिझेलचा वापर होत आहे. रॉकेल व डिझेल जळण्याचे ऍव्हरेज सारखेच आहे. मात्र, डिझेलच्या कार्बन उत्सर्जनामुळे भांडी काळी पडतात. नाइलाजाने डिझेलचा वापर हे कामगार करतात.

सोलापूर : शिधापत्रिकेवरील रॉकेल पुरवठा बंद झाल्याने व जास्त दर देऊनही रॉकेल कुठेच मिळत नसल्याने गरिबांच्या स्वयंपाकघरातील स्टोव्हची जागा गॅस शेगडी व सिलिंडरने घेतली आहे. मागणीच नसल्याने स्टोव्हचे उत्पादन बंद होत आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या घरांतला स्टोव्ह आता इतिहासजमा होत आहे.

 

हेही वाचा : नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ सोलापुरात निदर्शने

 

चूल ते गॅस शेगडी असा प्रवास
कालमानानुसार स्वयंपाकघरात परिवर्तन घडत आहेत. पूर्वी चुलीवर स्वयंपाक होत. पाणी तापवण्यासाठी बंब असायचे. वीज गेली तर रॉकेलची चिमणी, कंदील पेटवत. कालांतराने लाकडाच्या चुलीची जागा रॉकेलच्या स्टोव्हने, पाणी तापवण्याच्या बंबाची जागा वॉटर हिटर, गिझरने तर चिमणी, कंदीलची जागा चार्जेबल बॅटऱ्यांनी घेतली. श्रीमंतांच्या घरी व मोठ्या हॉटेलांत दिसणारी गॅस शेगडी सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आली तेव्हापासूनच स्टोव्ह बाजूला सारले जात होते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतून सर्वसामान्यांच्या घरांमध्ये गॅस शेगडी पोचली आहे; मात्र, सिलिंडरचे दर गरिबांच्या आवाक्‍यात नसल्याने रॉकेलच्या स्टोव्हचा वापर आजही काही प्रमाणात होत आहे.

हेही वाचा : अशी लग्नपत्रिका पाहिली का कधी?

डिझेलवर भागतेय रॉकेलची गरज
स्टोव्हची गरज आजही गरिबांसह शहरात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांना आहे. त्यांच्याकडून स्टोव्हमध्ये रॉकेलऐवजी डिझेलचा वापर होत आहे. रॉकेल व डिझेल जळण्याचे ऍव्हरेज सारखेच आहे. मात्र, डिझेलच्या कार्बन उत्सर्जनामुळे भांडी काळी पडतात. नाइलाजाने डिझेलचा वापर हे कामगार करतात, अशी माहिती स्टोव्हचे विक्रेते मुन्ना अत्तार यांनी दिली.

उत्पादक, कामगार झाले बेरोजगार
सोलापुरातील चार-पाच फॅब्रिकेटर्स सुट्या भागांपासून स्टोव्हचे उत्पादन करत होते. आता एकच उत्पादक तेही मागणी असेल तरच उत्पादन करत आहे. या क्षेत्रातील 250 ते 300 कामगार तसेच स्टोव्हचे विक्रेते दुकान बंद करून मार्केट यार्ड येथे कामाला तर कोण रिक्षा चालवणे अशा अन्य क्षेत्रात काम करत असल्याची माहिती स्टोव्हचे उत्पादक कय्युम कुरेशी यांनी दिली.

हेही वाचा : बेफिकीर प्रशासनाचा नमुना सत्तर फूट रोड!

रॉकेल बंद झाल्यापासून स्टोव्हची विक्रीच बंद झाली आहे. पूर्वी दिवसातून 30 ते 40 स्टोव्हची विक्री होत असे, ती आता एकवर आली आहे. गरिबांना सिलिंडरची किंमत एकरकमी 800 रुपये परवडत नाही. एक लिटर रॉकेल तीन-चार दिवस पुरते. रॉकेल पुन्हा चालू केल्यास स्टोव्हची विक्री वाढू शकते, अशी आमची आशा आहे.
- मुन्ना अत्तार, स्टोव्ह विक्रेते, सोलापूर

रॉकेल बंद झाल्याने माझ्या 40 वर्षांपासूनच्या स्टोव्ह दुरुस्तीच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. सॉल्डरिंग, बर्नर बदलणे व साफ करणे, वायसर बदलणे अशा कामांचे रोजचे 200 ते 300 रुपये मिळत होते. आता दिवसभर दुरुस्तीचे कामच नाही. गॅस शेगडीला मेंटेनन्सची जास्त गरज नसल्याने ती कामे अपवादाने मिळतात.
- जब्बार कोरबू, स्टोव्ह दुरुस्ती दुकानदार, सोलापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kerosene stove is becoming history