esakal | कोरोना काळात पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवायची? वाचा 6 टीप्स
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना काळात पॉझिटिव्ह एनर्जी कशी मिळवायची? वाचा 6 टीप्स

sakal_logo
By
शर्वरी जोशी

चीनच्या वुहान प्रांतातून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला भंडावून सोडलं आहे. या विषाणूने अनेक देशांमध्ये पाय पसरले असून लाखो जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. विशेष म्हणजे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे मात्र, ऑक्सिजन सिलेंडर, बेड, रेमेडिसीवर यांची कमतरता जाणवत आहे. त्यातच अद्यापही या विषाणूविरोधात कोणतंही ठोस औषध उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे संपूर्ण जगातील लोक हवालदिल झाले आहेत. सध्या जगभरात सुरु असलेलं मृत्यूचं सत्र पाहून सर्वत्र नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सतत नकारात्मक विचार केल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर व मानसिक स्वास्थ्यावर होत आहे. म्हणूनच, डॉ. भावना बर्मी यांनी कोरोना काळात स्वत: ला सकारात्मक ठेवण्यासाठी व नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी नेमकं काय करावं हे सांगितलं आहे.

१. इतरांशी संवाद साधा -

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात प्रत्येक जण घरात कोंडला गेला आहे. विशेष म्हणजे सतत घरातील चार भिंतींमध्ये अडकून पडल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक नकारात्मक विचार उत्पन्न होत आहेत. त्यामुळेच या नकारात्मक विचारांना थारा न देण्यासाठी घरातील व्यक्तींसोबत संवाद साधा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा, सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र परिवाराशी गप्पा मारा, व्हर्च्युअल मिटिंग करा.

२. मन शांत ठेवा -

सध्याच्या काळात मन शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नकारात्मक विचारांना सध्याच्या काळात मनात थारा देऊ नका. त्यामुळे विश्रांती घ्या, ध्यान करा, योगा करा. अशा विविध गोष्टींच्या माध्यमातून मनाचं आरोग्य जपा.

३. व्यायाम करा -

व्यायाम करणं हा मनासाठी आणि शरीरासाठी उत्तम सराव आहे. सध्या जीम वैगरे बंद असल्यामुळे सगळ्यांना घरातच रहावं लागत आहे. परिणामी, व्यायाम न केल्यामुळे वजन वाढणे, स्थुलता येणे असे प्रकार होऊ शकतात. त्यातच वजन वाढल्यामुळे अनेक जण नैराश्यात जातात. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करा. यात एरोबिक्स, झ्मुबा असे प्रकार करुन स्वत:ला फिट ठेवा. यामुळे शरीरासोबतच मानसिक ताण व थकवादेखील दूर होईल.

४. सतत काळजी करु नका -

अनेकांना सतत काळजी करण्याची सवय असते. जुने विषय आठवून किंवा समोर घडलेल्या घटनेवर ते बराच काळ विचार करतात. ज्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडते. त्यामुळे सतत काळजी, चिंता करु नका.

५. आव्हानं स्वीकारा -

अनेक जण कोणत्याही गोष्टीमुळे सहज घाबरुन जातात. पॅनिक होतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी लहान लहान आव्हानं स्वीकारा. आव्हानं स्वीकारल्यामुळे कोणत्याही गोष्टीचा सामना करणं सहज शक्य होतं. त्यामुळे लहान गोष्टींपासून सुरुवात करा आणि चॅलेंज स्वीकारा.

६. स्वत:शी संवाद साधा -

जगातला आपल्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपण स्वत:च. त्यामुळे मनात कोणतीही गोष्ट न ठेवता स्वत:शी संवाद साधा. स्वत:शी संवाद साधल्यामुळे मनावरील दडपण दूर होतं.

loading image