विश्‍वासाचं नातं

मैत्रीची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी आहे. ज्याच्याकडे आपण कोणताही संकोच न बाळगता आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो तेच आपले मित्र असतात.
actress hemal ingale and mother dhanashri ingale
actress hemal ingale and mother dhanashri ingalesakal

- हेमल इंगळे, धनश्री इंगळे

मैत्रीची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी आहे. ज्याच्याकडे आपण कोणताही संकोच न बाळगता आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो तेच आपले मित्र असतात. असा विचार करणारी अभिनेत्री हेमल इंगळे तिच्या आईतच आपली मैत्रीण बघते.

या ‘मायलेकी - कम - बेस्ट फ्रेंड’ अशा नात्याविषयी बोलताना हेमल म्हणाली, ‘माझ्या खूप बेस्ट फ्रेंड्स आहेत; पण त्या सगळ्यांमध्ये टॉपला कुणी असेल, तर ती माझी आई आहे. मी आईशी सगळ्या गोष्टी शेअर करते. अगदी शाळेतल्या पहिल्या क्रशपासून सगळ्या गोष्टी मी तिला सांगते, कारण आईनं नेहमीच आमच्या नात्यात तेवढा कंफर्ट झोन तयार केला आहे. आमच्यातलं आई-मुलीपेक्षा मैत्रीचं नातं मला अतिशय आवडतं.

मला असं वाटतं, की हे आईमुळंच झालं आहे. तिनं मला तेवढा विश्वास दिला आणि मुख्य म्हणजे स्वातंत्र्य दिलं. बऱ्याचदा पालक त्यांच्यावर बंधनं घालत असतात. त्यामुळे ती मुलं त्यांच्या पालकांशी न बोलता इतर लोकांशी मनातल्या गोष्टी शेअर करतात. परंतु माझ्या आईनं पालकत्वात वेगळी पद्धत अवलंबली. त्यामुळे माझे आणि माझ्या बहिणीचेही आमच्या पालकांशी-विशेषतः आईशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत.’

तिच्या आई म्हणजेच धनश्री म्हणाल्या, ‘‘आपली मुलं मोठी होत असतात, तेव्हा ठरावीक काळात आपण मुलांची मैत्रीण होणं फार गरजेचं असतं आणि हे बदल एका रात्रीत नाही होत. याची जाणीव ठेवून तेवढा वेळ आपल्या नात्याला देणंही गरजेचं आहे. आपण मुलांवर विश्वास ठेवतो आणि त्यांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं पालक म्हणून जिंकलेलो असतो.

बाहेरच्या जगात वावरताना कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे, जेणेकरून लोक काय म्हणतील, यांसारख्या गोष्टी पालक म्हणून आपल्या मुलांना सांगताना ते कोणत्याही बंधनांच्या आणि मर्यादांच्या स्वरूपात न सांगता, त्यांचे मित्र होऊन या गोष्टी त्यांना सांगितल्या, तर त्या त्यांना लगेच कळतात. म्हणून मी हेमलच्या बाबतीत कधीही कोणतीच बंधनं तिच्यावर नाही लादली. मी तिला सगळ्या बाबतीत स्वातंत्र्य दिलं.’’

हेमल म्हणाली, ‘माझी आई माझ्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आहे. ती नेहमी हसतमुख असते. त्यामुळे तिच्या आसपास नेहमीच सकारात्मकता असते. मी कामानिमित्त लोकांना भेटते, तेव्हा बऱ्याचवेळा ते मला सांगतात, की तू येतेस तेव्हा तुझ्यासोबत आपोआपच पॉझिटिव्ह वाईब्ज येतात. तेव्हा मी त्यांना सांगते देखील, की ‘तुम्ही माझ्या आईला भेटा. जर तुम्हाला माझ्यात दहा टक्के सकारात्मकता जाणवत असेल, तर तिच्यात शंभर टक्के जाणवेल.’

मात्र, कधीकधी मला तिच्यातली एक गोष्ट आवडत नाही ती म्हणजे आई नेहमीच लोकांचा खूप विचार करते. म्हणजे बऱ्याचदा आम्ही किंवा कोणीही तिच्याकडे येऊन आपली व्यथा मांडतात, तेव्हा आई त्या गोष्टींचा अतिविचार करते आणि स्वतःला त्रास करून घेते.

ती समोरच्याला सल्ले देते, काय चांगलं, काय वाईट हे सांगते; पण त्यासोबतच जगत लोकांसोबत वाईट गोष्टी का घडतात याचा विचार करत बसते. हा विचार तिच्या मनात येतो, कारण तिचं मन अतिशय निर्मळ आहे. परंतु मला असं वाटतं, की तिनं हा अतिविचार करणं कमी करावं.’’

धनश्री म्हणाल्या, ‘हेमल माझी मुलगी असली तरी बऱ्याचवेळा ती माझी आई होते आणि माझी काळजी करते. तिनं मला व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम कसं वापरतात, कपडे कसे घालावेत, इतरांशी कसं बोलावं यासारख्या गोष्टी शिकवल्या. तिच्यातली मला आवडणारी गोष्ट म्हणजे ती कधीच हार मानत नाही. ती जे ठरवते ते करण्यासाठी प्रयत्न करतच राहते.

अपयश आलं, तरी न डगमगता ती पुन्हा उभी राहते आणि मेहनत सुरू ठेवते. अर्थात तिचं असंही आहे, की कधी कधी तिला स्वतःवरच विनाकारण शंका येते. मला हे जमेल का, असा विचार करत बसते. मला वाटतं, की तिच्यात तेवढा आत्मविश्वास आहे, त्यामुळे तिनं असं स्वतःवर शंका न घेता काम केलं पाहिजे.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com