Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

मुलांबरोबरच मुलींमध्ये धूम्रपान व हुक्क्याचे व्यसन वाढताना दिसत आहे. इतरही अनेक प्रकारची व्यसने वाढत आहेत. त्यात युवकांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसते.
Addiction in Teens
Addiction in TeenseSakal

- डॉ. वंदना जोशी, अश्विनी तांबे

मुलांबरोबरच मुलींमध्ये धूम्रपान व हुक्क्याचे व्यसन वाढताना दिसत आहे. इतरही अनेक प्रकारची व्यसने वाढत आहेत. त्यात युवकांचे प्रमाण मोठे असल्याचे दिसते. या प्रश्‍नाची दाहकता किती तीव्र आहे, याची माहिती देतानाच व्यसनांच्या विविध कारणांवर प्रकाश टाकणारी ही लेखमाला. या प्रश्‍नावरील उपाययोजनांची माहितीही त्यात असेल.

स्वप्नील पोपटे (नाव बदलले आहे), एक ३२ वर्षांचा उमदा, देखणा तरुण... गुटख्याच्या व्यसनात पुरता अडकलेला. दिवसातून कैकवेळा चकचकीत वेस्टनाच्या पुड्या तोंडात सोडायचा. तोबरा भरून स्वतःच्याच तंद्रीत, गुर्मीत दिवस घालवायचा. पण त्याला हळूहळू, आवाजात बदल आणि गिळायला त्रास अशा तक्रारी सुरू झाल्या. तपासणी केल्यावर कर्करोगाचे निदान झाले. ‘टाटा’ला उपचारांना पाठवले. स्वरयंत्र काढले. श्वसनाकरता नळी बसवली. पण एका रात्री तेथून रक्तस्राव होऊन इहलोकाच्या यात्रेस गेला.

रोगनिदान झाल्यावर दीड वर्ष सरत नाही तो  डोळ्यासमोरून नाहीसा झाला!  बायको आणि दोन मुले उघड्यावर पडली. पत्नी आता पोळ्या करून, विद्यार्थ्यांना डबे देऊन आयुष्य कंठत आहे. आश्चर्य म्हणजे याच्या भावाला असलेले पानमसाल्याचे व्यसन तरीही सुटलेले नाही! या स्वप्नीलसारखे शेकडो, हजारोंनी तरुण आपल्या आसपास आहेत आणि तरुण वयातच व्यसनांमुळे आयुष्याला मुकत आहेत.

भारताला मौखिक कर्करोगाची राजधानी मानले जाते. कारण विविध कर्करोगांत ३३ टक्के रुग्णांमध्ये तंबाखू- गुटख्याचे सेवन हे कारण ठरते आणि ते आपण टाळू शकतो. देशात मोठ्या प्रमाणात लोक या व्यसनात अडकले आहेत. भारत जगभरातील ११५हून अधिक देशांमध्ये तंबाखू निर्यात करतो. या वनस्पतीला संस्कृतमध्ये ताम्रपर्ण, गुच्छफल, क्षारपत्रा, ताम्रकुट व धुम्रपत्र अशी नावे आहेत. शास्त्रीय नाव निकोटिआना टॅबकम. निकोटिन हे कीटकनाशक आहे. या तंबाखूच्या पानात इतर काही पदार्थ मिसळून विविध उत्पादने जसे की, विडी, सिगारेट, सिगार, चिरूट, हुक्का, गुटखा, तपकीर आदी बनवले जाते.

तंबाखूमध्ये असणाऱ्या निकोटिनमुळे नशा येते. ज्यावेळी तंबाखूयुक्त गोष्टीचे सेवन होते त्यावेळी त्यातील निकोटिन वेगाने रक्तप्रवाहात मिसळते. धूम्रपानाने वा तपकीर ओढल्याने ते श्वसनमार्गातून रक्तात मिसळते. मग १०-२० सेकंदात ते संपूर्ण शरीरभर पसरते आणि महत्त्वाचे म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचून नशा चढल्याचा अनुभव देते. निकोटिन रक्तप्रवाहात मिसळले की आपल्या मनात शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची तात्पुरती व फसवी भावना निर्माण होते. निकोटिनचा हा परिणाम काही काळाने शुद्ध रक्त पुरवठ्याने कमी होतो. या भावनेचा अनुभव परत परत यावा, यासाठी पुन्हा निकोटिनचे सेवन केले जाते आणि थोड्याच काळात त्याचे व्यसन लागते. या व्यसनाने कर्करोगाव्यतिरिक्त उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, अल्झायमर्स होण्याची शक्यता जास्त असते. टाटा हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्या वेगवेगळ्या कर्करोगांच्या रुग्णांचे वय दुर्दैवाने आता हळू कमी-कमी होत चाललेले दिसत आहे!

Addiction in Teens
Online Gaming : ऑनलाईन गेमिंगचं व्यसन वाढतंय, फडणवीसांनी केली केंद्र सरकारकडे मोठी मागणी

इतर दुष्परिणाम

व्यसनांमुळे मुलांच्या मानसिकतेत बदल होत जातो. लक्ष विचलित होते. स्वतः मुले व पूर्ण कुटुंब अक्षरशः भरडले जाते. अभ्यासावर वा नंतर कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. या व्यतिरिक्त तंबाखूच्या लागवडीमुळे मातीचा कस कमी होणे, बाकी पिके नंतर तिथे न येणे, प्रदूषण वाढणे, वणवा लागणे अशा गोष्टीही होतात. जवळच्या पान-टपरीवाल्यांशी जाऊन बोललात तर लक्षात येईल की अगदी ११ ते १३ वर्षे वयाची मध्यमवर्गीय घरांमधील मुलेसुद्धा धुम्रपानाकरिता टपरीवर पोहोचत आहेत. उर्मटपणे सिगारेट मागत आहेत. कधी मुली सुद्धा ग्रुपमध्ये असतात, फक्त मुले सिगारेट घ्यायला पुढे येतात. थोडे दूर कोपऱ्यावर उभे राहून सगळेजण धूम्रपान करतात. या कोवळ्या वयात या मुलांकडे पैसे तर आई-वडीलच देतात ना? मग आपण दिलेल्या पैशांचे मुले काय करतात, याची जबाबदारी पालकांची नव्हे काय? 

धूम्रपान व हुक्का

मुलांबरोबरच मुलींमध्ये धूम्रपान व हुक्क्याचे व्यसन वाढताना दिसत आहे. आपली मुले-मुली ४ ते ७ या संख्येने अभ्यासाकरिता म्हणून एकत्र जमत असली तर पडताळून घ्यावे की ते हुक्का किंवा गांजाकरिता तर एकत्र जमत नाही आहेत ना? १८ ते २५ वर्षे या वयात हे सध्या फारच प्रचलित आहे. मुलींमध्ये या व्यसनांमुळे पुढे जाऊन मूल होण्यास समस्या, व्यंग असणारे वा मृत मूल जन्माला येणे, बाळाचा अकाली जन्म या समस्या वाढताना दिसत आहेत. गरोदरपणातही मुली सिगारेट ओढणे थांबवू शकत नाहीत! इतकेच नाही तर जे स्वत: तंबाखू सेवन करत नाहीत पण सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या आसपास असतात. त्यांनादेखील दमा, फुफ्फुसाचे विकार संभवू शकतात.

Addiction in Teens
Mobile Addiction : सोशल मीडियाच्या नादात हरवले ‘मामाचे गाव’,बच्चे कंपनीला मोबाईलचा हव्यास

२०१९ रोजी केलेल्या जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार, १३ ते १५ वयोगटांतील मुला-मुलींवर अभ्यास केला गेला, त्यात आढळले की मुलींमध्ये देखील या घातक व्यसनाचा विळखा वाढत आहे. शाळा, महाविद्यालयाजवळ याची विक्री केली जाऊ नये, हा नियम जरी जारी केला आहे तरी या गोष्टीची सहज उपलब्धता, मुलांमधील त्याबाबतची उत्सुकता, घरातील प्रौढांकडून याचे होणारे सेवन, त्याविषयी असणारे गैरसमज (जसे की सिगारेट प्यायल्याने ताण जातो) हे मुलांना व्यसनाकडे अधिक आकर्षित करतात. हे सर्व पदार्थच फार व्यसनशील आहेत आणि आपल्या मुलांचे शील आपण लहानपणी पुरेसे घडवत नाही आहोत, असे वाटते. महत्त्वाचे म्हणजे निकोटीनमुळे मेंदूमध्ये ‘डोपामीन’ हे रसायन स्त्रवते, ज्याची पातळी कमी झाली की परत मेंदूकडून जास्त निकोटीनची मागणी होते, आणि ही प्रक्रियाच मुलांना व्यसनाकडे नेते.

मुलांमध्ये व्यसनाबाबत जागरूकता आणण्याचे काम ‘पेस ग्रुप, पुणे’ (प्रिव्हेंट ॲडिक्शन थ्रू चिल्ड्रेन एज्युकेशन) या संस्थेतर्फे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर केले जाते. ते मोठ्या प्रमाणावर करायला लोकसहभागाची गरज आहे. संस्थेचे घोषवाक्य आहे - आयुष्याची मौज राखा, टाळून तंबाखू गुटखा!

पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

एक काळ असा होता की टपऱ्यांवर मुख्यत्वे पान विकले जायचे म्हणून तर त्यांना आपण पान-टपरी म्हणतो. काही लोक तंबाखूमिश्रित पान खायचे; परंतु, आता पानापेक्षा ‘गुटखा विक्री केंद्र’ असे यांचे स्वरूप बदलले आहे. गुटख्यावर बंदी असे सांगितले जात असले तरी तंबाखू व पानमसाला असे दोन्ही एकत्र करून टपरीवर सर्रास दिले जाते. पानवाल्यांच्यामागची ‘मागणी तसा पुरवठा’ करणारी यंत्रणा जास्त जोरात चालते आणि केवळ मागणी जास्त असल्याने गुटखा जास्त विकला जातो.

साधारण १९९०च्या सुमारास पहिल्यांदा आलेला गुटखा आता धुमाकूळ घालत आहे. गायछाप जर्दा, मावा, खर्रा, खैनी यापेक्षा सुद्धा गुटख्याची जास्त चलती आहे. आणि त्यातील रसायने जास्त घातक आहेत. ‘पानमसाला’ म्हणून सरसकट सध्या जाहिराती करतात, प्रत्यक्षात त्या सर्व नावांचे गुटखा उपलब्ध आहेत आणि या गुटख्याने युवापिढीत व मोठ्यांतही थैमान घातले आहे. १३ ते २१ वर्षे वयोगटात गुटख्याबरोबरच धूम्रपान अधिक प्रमाणात चालू आहे.

(डॉ. जोशी कान, नाक, घसातज्ज्ञ असून ‘पेस ग्रुप पुणे’च्या अध्यक्ष, तर तांबे या समुपदेशक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com