सर्जनशीलतेचा ‘धागा’

वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यामुळे माझे बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले. शिक्षणही तसेच झाले, कधी या शाळेत तर कधी त्या.
cloth business
cloth businesssakal

- अल्पना सुरतकर, संस्थापक, अल्पना क्रिएशन्स

वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यामुळे माझे बालपण वेगवेगळ्या शहरांमध्ये गेले. शिक्षणही तसेच झाले, कधी या शाळेत तर कधी त्या. मात्र, इंजिनिअरिंगसाठी मी औरंगाबाद येथे स्थिरावले आणि औरंगाबाद गव्हर्नमेंट कॉलेजमधून आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासून चांगले मार्क्स मिळवणे किती महत्त्वाचे आहे, याचेच धडे घरातून दिले जात असल्याने मोठे होऊन भरपूर शिक्षण घेणे आणि इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हायचे या पलीकडे कधीही विचार न करणारी मी व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आणि स्वतःचा कपड्यांचा व्यावसाय सुरु केला. अल्पनाचा ‘अल्पना क्रिएशन्स’ हा ब्रॅंड तयार केला.

फॅशनची आवड

वडिलांच्या बदलीमुळे मला पुण्यात यावे लागले. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करुन आम्ही पुण्यात स्थायिक झालो. मात्र, निकाल अजून आला नव्हता. निकाल येईपर्यंत वेळ हातात होता. तेव्हा १९९२ मध्ये फर्ग्युसन कॉलेज रोडवरील आयआयटीसी या संस्थेमधून मी तीन महिन्यांचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला. तेव्हा समजू लागले, की आपल्याला हे आवडते आहे.

महिला म्हणून आपल्याला काही गोष्टी लहानपणासून आवडत असतात. उदाहरणार्थ, वेगळे डिझाईन केलेले कपडे, दागिने आदी. फॅशनबाबत प्रत्येक स्त्रीची एक वेगळी शैली असते. कोर्स करत असताना समजायला लागले, की आपला कल कल्पकतेकडे जास्त आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची आवड आहे आपल्याला.

मला माझी आवड समजू आणि उमगू लागली होती. त्यानंतर आवडीमुळे मी थोडे जास्त लक्ष देऊन हे सर्व करू लागले. नवीन डिझाईनचे ड्रेसेस बनवू लागले. हवे तसे कापड खरेदी करून सुरुवातील स्वतःसाठी, नंतर मैत्रिणींसाठी ड्रेस शिवण्यास सुरुवात केली. त्यानाही मी तयार केलेले पॅटर्न्स पसंत पडू लागले होते. मात्र, हे सर्व मर्यादितच राहिले. माझे लग्न झाले.

माझ्या माहेरी व्यवसायाची कुठलीच पार्श्वभूमी नाही. घरातील बहुतांश लोक इंजिनिअर असून नोकरी करणारे होतो. लग्नानंतर सासरी सगळेच जण व्यवसाय, नोकरी किंवा काही ना काही तरी करत होते. माझ्या सासूबाई नेहमीच म्हणत असत, ‘अल्पना तूही काहीतरी कर.’ काही तरी म्हणजे नक्की काय करू, याचा मी विचार केला आणि माझ्यातील कलेला पुन्हा वाव देण्याची संधी चालून आल्यासारखे वाटू लागले.

एक मूल झाल्यानंतर काही काळ लोटल्यानंतर मी घरच्या घरी शिवण्यास सुरुवात केली. सोसायटीतील महिला आणि मैत्रिणींना मी तयार केले ड्रेस आवडले आणि त्यांनीच मला याचे रूपांतर व्यवसायात करण्याची कल्पना दिली आणि मी माझ्या व्यवसायाचे मार्केटिंग सुरु केले.

मी सुरुवातीला हवे तसे ड्रेस मटेरियल घेऊन यायचे. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील टेलर्सकडून माझे पॅटर्न, फॅशन देऊन ड्रेस शिवून घ्यायचे. अगदी पाच-दहा हजार रुपये एवढ्या तुटपुंज्या भांडवलापासून वयाच्या पंचविसाव्या वर्षी या व्यवसायाला सुरवात केली.

व्यवसायातील आव्हाने..

सुरुवातील काही दिवस एका शॉपमध्ये काम केले आणि मार्केटिंग कसे करावे, आपली वस्तू कशी विकावी याबद्दलची माहिती घेत असताना, आपण स्वतःचाच कपड्यांचा ब्रॅंड सुरू केला तर, असा विचार मनात आला आणि मी माझ्या व्यवसायाची सुरुवात केली.

व्यवसायास सुरुवात केल्यानंतर लगेचच यश मिळत नसते, हे वाक्य नेहमीच डोक्यात फिरत होते. त्यामुळे कष्ट, चिकाटीची सवय लावून घेतली आणि त्याप्रमाणेच ते केले. माझ्या कल्पनेनुसार कपडे शिवून लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अनेक ऑफिसमध्ये कपडे दाखवत होते. विविध सोसायटी, भिशींमध्ये जाऊन ओळखीच्या व्यक्तींना माझ्या ब्रॅंडची माहिती देत होते. त्यातून कपड्यांची मागणी वाढत गेली. पुढे वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्येही सहभागी होऊन आपली कला लोकांपर्यंत पोचवू लागले.

‘कॉटन’ हा कपड्यांतील प्रकार सर्वांच्याच आवडीचा आहे. त्यामुळे मी मुख्यत्वे याकडे लक्ष दिले आणि त्यासाठी इतर शहरांमध्ये जाण्यास सुरुवात केली. आणि तेथून सर्व मटेरिअल विक्रीसाठी आणू लागले.

पुढे स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचे वितरण करण्याची संधी मिळाली. त्यावेळी जॉकी, लव्हेबलसारखे मोठे ब्रँड्स मिळाले. हे काम करणारे त्या काळात हाताच्या बोटांवर मोजण्याइतके वितरक बाजारात होते. त्यामुळे या संधीचे मी सोने केले. त्यावेळी छोटेखानी शॉपिंग मॉल पुण्यात तयार होत होते. या मॉल्समध्ये कुर्ते, टॉप्स विकायला ठेवण्यास सुरुवात केली. २००५ मध्ये इतर गोष्टी बंद करून फक्त कुर्त्यांचे उत्पादन सुरू झाले. आता राज्यातील विविध शहरांमध्ये माझ्या ब्रँडचा विस्तार झाला आहे. आता माझा मुलगाही मला व्यवसायामध्ये मदत करतो.

व्यवसायात कायम टिकून राहायचे असेल, तर सातत्य आणि चिकाटी महत्त्वाची आहे. अपयशांना न घाबरता त्याचा सामना केला पाहिजे. निर्णयक्षमता आणि क्षेत्राचा संपूर्ण अभ्यास नेहमीच महत्त्वाचा ठरतो.

(शब्दांकन : सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com