
सायली शिंदे - योगतज्ज्ञ
संधिवातामुळे महिलांना हात, पाय, गुडघे, मणका आणि कंबर यामध्ये वेदना, सूज, स्टिफनेस आणि हालचालींमध्ये मर्यादा येते. अशा वेळी योग्य योगासनांचा सराव केल्यास सांध्यांना लवचिकता मिळते, रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज-ताठरपणा कमी होतो.
उत्तानपादासन (पाय वर घेण्याचे आसन) : पाठीवर झोपा, दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. श्वास घेत दोन्ही पाय हळुवारपणे ३० ते ४५ अंशांनी वर उचला. काही सेकंद पाय स्थिर ठेवा. नंतर श्वास सोडत हळूहळू पाय जमिनीवर आणा. फायदे : पायातील सूज कमी होते, गुडघ्यांवरील ताण कमी होतो.
अर्धा कटिचक्रासन (कमरेपासून वळण्याचे आसन) : ताडासनमध्ये उभे राहा. डाव्या हाताला कमरेवर ठेवा, उजवा हात पुढे आणा. श्वास घेत उजवीकडे कंबरेपासून सावकाश वळा, दृष्टी मागे नेण्याचा प्रयत्न करा. नंतर श्वास सोडत पुन्हा सरळ स्थितीत या. दुसऱ्या बाजूनेही करा. फायदे : कमरेचा स्टिफनेस कमी होतो, पाठीचा कणा लवचिक होतो, सांध्यांना बळकटी मिळते.