Video : लाइफस्टाइल कोच : 'इटिंग' डिसऑर्डर समजून घेताना...

डॉ. मनीषा बंदिष्टी
Tuesday, 7 April 2020

डिसऑर्डरचे मुख्य प्रकार
1) भूक मंदावणे (Anorexia Nervosa)
2) भूक वाढणे (Bulimia Nervosa)
हा विकार असणाऱ्यांना वजन वाढून लठ्ठ होण्याची प्रचंड भीती सतावत असते. अनेकवेळा चिंता व इतर मानसिक विकारही यातून उद्‌भवतात.

मनुष्याला अस्तित्वासाठी आहार आवश्यकच. मात्र, काहीवेळा खाण्याची विकृती (Eating Disorders) जडते. खाण्याच्या अनियमित वेळा आणि विविध ताण किंवा शरीराचा आकार, वजनाच्या काळजीमुळेही हा विकार जडतो. या लोकांच्या खाण्याच्या पद्धतीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. त्याचा संबंध विचार आणि भावनांशी असतो. प्रामुख्याने १२ ते ३५ या वयोगटातील महिलांमध्ये तो आढळतो.

भूक मंदावणे (Anorexia Nervosa)
या प्रकारात रुग्ण सडपातळ होतात. याची कारणे  

 • लठ्ठ होण्याची प्रचंड भीती
 • अपुरा आहार
 • स्वत:च्या शरीरप्रतिमेची काळजी
 • सामान्यत: हे रुग्ण पुरेसा आहार घ्यायला नकार देतात. नेहमी अतिव्यायाम करतात. सततच्या उपासमारीमुळे खालील लक्षणे उद्‌भवू शकतात.
 • त्वचेचा कोरडेपणा
 • हाडांमधील कॅल्शिअम कमी होणे  (ओस्टिओपोरॉसिस किंवा ओस्टिओपॅनिया)
 • सौम्य रक्तक्षय
 • नैराश्य व आळशीपणा
 • नखे, केस कमकुवत होणे
 • मासिक पाळीचे चक्र विस्कळीत होणे.
 • स्नायूंच्या वेदना
 • कमी रक्तदाब

भूक वाढणे (Bulimia Nervosa)
या विकारातील रुग्णाचे वजन किंचित कमी, सामान्य किंवा अतिरिक्तही असू शकते. ते वेळोवेळी पुन:पुन्हा खात राहतात. कमी वेळेत अधिक खाण्याचे लक्षणही आढळते. वजन कमी होण्याच्या भीतीमुळे हे रुग्ण जबरदस्तीने उलटी करतात. रेचकही वापरतात. त्यांच्यामध्ये खालील लक्षणे आढळतात. 

 • सतत उलटी केल्याने पोट, पचनसंस्थेशी निगडित विकारही होणे.
 • गंभीर सूज आणि घसा खवखवणे.
 • रेचक वापरल्याने चुरचुरणे, त्यातून आतड्यांच्या समस्या निर्माण होणे.
 • द्रव पदार्थांच्या शुद्धीकरणामुळे तीव्र निर्जलीकरण.
 • यातून अन्ननलिका, जठर, हृदयाशी निगडित जीवघेण्या समस्या निर्माण होणे

उपचार -
या विकाराच्या शारीरिक, भावनिक लक्षणांवर उपचार न घेतल्यास कुपोषण, हृदयविकार व इतर प्राणघातक समस्या उद्‌भवू शकतात. परंतु, योग्य वैद्यकीय उपचारांमुळे खाण्याच्या सवयी पूर्ववत करता येतात. त्यातून भावनिक व मानसिक आरोग्यही सुधारते. अनेकवेळा रुग्णांवर मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ आणि वैद्यकतज्ज्ञांचे एकत्रित उपचार घ्यावे लागतात. रुग्णाचे मानसिक आरोग्य लक्षात घेऊन ते करायला हवेत. आहारतज्ज्ञांनी आखून दिलेल्या आहार आराखड्याच्या मदतीने रुग्ण आवश्यक वजन ठेवू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr manisha bandishti on Understanding Eating Disorders