Street Shopping in Pune : पुण्यात स्वस्त आणि मस्त स्ट्रीट शॉपिंगसाठी हे आहेत उत्कृष्ट पर्याय

Best Street Shopping Options in Pune
Best Street Shopping Options in Pune

Best Street Shopping Places: शॉपिंग प्रत्येकाच्याच आवडीचा विषय, मग ते घर सजविण्यासाठी असलेली खरेदी असो किंवा लुक चेंज करण्यासाठीचे फॅशनेबल कपडे वा दागिन्यांची खरेदी! भरलेलं पाकीट खिशात असलं की, वीकएंडला शॉपिंग करण्यात एक वेगळाच उत्साह असतो.

तुम्ही ही शॉपिंग थेट बाजारात जाऊन किंवा ऑनलाइनही करू शकता. ऑनलाइन शॉपिंगमध्ये त्या वस्तूचा प्रत्यक्ष फील नसला, तरी यामुळं भरपूर वेळ वाचतो आणि महत्त्वाचे म्हणजे एनर्जी!

असं असलं तरी प्रत्यक्ष खरेदीचा आनंद हा वेगळाच असतो. विविध दुकानं फिरल्यानंतर एखाद्या दुकानात पसंत पडलेला ड्रेस, त्याचे ट्रायल आणि मग त्याच्यावर विकत घेतलेली मॅचिंग ज्वेलरी! यानंतर आलेला थकवा आणि लागलेल्या भुकेला पर्याय असतो तो भेळ, पाणीपुरीचा!

पुण्यात शॉपिंगसाठी कॅम्प, तुळशीबाग, एफसी रोड अशी बरीच ठिकाणं आहेत. आज मात्र आपण एफसी रोडवरील ‘रहस्यमय शॉपिंग’विषयी जाणून घेणार आहोत.

मॉल, शॉप्समध्ये कितीही चांगल्या दर्जाचे कपडे मिळत असले, तरी स्ट्रीट शॉपिंगची एक वेगळीच मजा असते. असंख्य पर्याय, बार्गेनिंग आणि बरंच काही इथं मिळतं. याचा फायदा म्हणजे अगदी ५०० रुपयांतही तुम्ही बरंच काही खरेदी करू शकता.  

डेक्कन कॉर्नरपासून शिवाजीनगरला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या बाजूपासून (आपलं बजेट जास्त असंल आणि जरा दर्जेदार खरेदी करायची इच्छा असल्यास एफसी रोडच्या डावीकडील दुकानं तुम्हाला खुणावत असल्याचं जाणवंल.) ही शॉपिंग सुरू करता येते.

तुमचा पहिला स्टॉप असेल अर्थातच हॉंगकॉंग लेन! दिसायला छोटीशी बोळ असली, तरी आत गेल्यावर तुम्हाला इथल्या शॉपिंगची भव्यता लक्षात येते. मोबाईल कव्हर, एक्सेसरीज, किचेन्स, पर्स अशा विविध वस्तू इथं तुम्हाला मिळतील.

इथं २०० रुपयांपासून १००० रुपयापर्यंतच्या पर्स तुम्हाला मिळतील. ट्रेंडी राहायची सवय असल्यानं आपण लवकर पर्स बदलतो. त्यामुळं २०० रुपयांपर्यंतची एखादी छानशी पर्स तुम्ही खरेदी करू शकता. तिला अजून छान सजवायचं असल्यास एखादं किचेन तर बनताही है बॉस!

आता या लेनमधून बाहेर पडून पुन्हा पुढं चालू लागायचं. थोडं पुढं गेल्यावर तुम्हाला मेकअपच्या सामानाची दुकानं लागतील. इथं आयलायनरपासून अगदी नेलपेंट, फाउंडेशनही तुम्ही विकत घेऊ शकता.

पर्सला मॅचिंग असणारा एखादा क्लच किंवा रबरबॅण्ड घेतला, तरी तुमचा लुक ट्रेंडी व्हायला मदत होते. क्लच आणि रबरबॅण्ड साधारणतः २०, ३० रुपयांच्या रेंजमध्ये मिळतील. रस्त्यावर मोठाले बॉक्स घेऊन बसलेले टॉप विक्रेतेही तुम्हाला दिसतील.

पण थांबा, घाई करू नका. पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त! वाडेश्‍वरच्या पुढच्या बाजूला गेल्यावर एक झाड दिसेल. झाड आहे, म्हणून दुर्लक्ष करू नका.

झाडाच्या बाजूला लटकत असलेले टॉप, जॅकेट्स तुम्हाला त्या ‘रहस्यमय शॉपिंग सेंटर’मध्ये नेतील... आत गेल्यानंतर लक्षात येईल, ५०० रुपये खूप मोठे नाहीत,. पण तरीही आपलं बजेट आपण विसरायचं नाही. इथं टॉप, जॅकेट्स, कुर्ते, वनपीस, टुपीस, थ्रीपीस, पलाझो, जीन्स असे असंख्य प्रकार पाहायला मिळतील.

तुमच्या बजेटमध्ये बसणारा आणि छान वाटणारा एखादा टॉप खरेदी करून इथून बाहेर पडताना फुटवेअरचे विविध प्रकार दिसतील. अर्थात, बजेट असल्याशिवाय त्याकडं वळू नका. आता ४ ते ५ तास खरेदीत घालवल्यानंतर परत येताना एखादं सॅण्डविच किंवा पाणीपुरीची ट्रीट आपण स्वतःला  द्यायलाच हवी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com