पावसाळ्यात फॉलो करा 'हे' डाएट ; कायम रहाल निरोगी

या काळात पचनशक्ती मंदावल्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता या सारख्या समस्या निर्माण होतात
diet
diet

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. परंतु, या काळात अनेकांना शारीरिक व्याधी जाणवू लागल्या आहेत. अनेक जण सध्या स्थुलता, पाठदुखी, खांदेदुखी यासारख्या समस्येने त्रस्त आहेत. त्यातच आता पावसाळा सुरु झाल्यामुळे या बदलेल्या ऋतूचा परिणामदेखील शरीरावर होत आहे. या काळात पचनशक्ती मंदावल्यामुळे अनेक जण पोटदुखी, बद्धकोष्ठता या सारख्या समस्यांना समोरं जात आहेत. म्हणूनच, वर्क फ्रॉम होम आणि पावसाळा या काळात आहारात कोणत्या डाएटचा समावेश करावा ते जाणून घेऊयात. (Ayurvedic-Diet-to-follow-during-Rainy-Season-ssj93)

पावसाळ्यामध्ये अनेक शारीरिक समस्या डोकं वर काढत असतात. यामध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे वात आणि पित्त. पावसाळ्यात शरीरातील वात दोष वाढतो व पित्ताची संचिती होऊ लागते. सोबतच पोटातील अग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे पचनशक्तीही मंदावलेली असते. त्यामुळेच या काळात पचनाच्या तक्रारी, गॅसेस ,बद्धकोष्ठता अशा समस्या डोके वर काढू लागतात. म्हणूनच, पावसाळ्यात शक्यतो हलका आहार घ्यावा.

diet
Monsoon Lips Care Tips: पावसाळ्यात घ्या ओठांची काळजी!

पावसाळ्यात फॉलो करा 'हे' डाएट

१. दररोज नियमितपणे सूर्यनमस्कार करावेत. किंवा, चालणे, पळणे, योगासने करावीत.

२. हलका आहार घ्यावा.

३. सकाळी चहा ऐवजी आयुर्वेदिक काढा प्यावा. यासाठी ३ कप पाणी घेऊन त्यात लहानसं हळकुंड, दालचिनी, आलं टाकावं आणि हे पाणी उकळवून घ्यावं. साधारणपणे १ कप होईल इथपर्यंत हे पाणी उकळावं. हा काढा प्यायल्यामुळे पोटाशी निगडीत समस्या दूर होतात. पचनक्रिया सुरळीत होते.

४. तसंच २ कप पाण्यात २ चमचे जिरं घालून ते १ कप होईपर्यंत अटवून घ्या.आणि, हे पाणी दिवसातून एकदा प्या. पाण्यात असलेले जिरे चावून खा.

५. वजन वाढल्यास कोरफड रस + आवळा रस (दोन्ही १-१ चमच३), अर्धा ग्लास कोमट पाणी , ७-८ थेंब लिंबाचा रस व १ चमचा मध घालून घ्यावे.

'या' नियमांचं करा पालन

१. पाणी -

दररोज उकळून थंड केलेले पाणी प्यावं. जर शक्य असेल तर थंड पाण्याऐवजी कोमट पाणीच प्यावे. तसंच जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासानंतर पाणी प्यावे. जेवताना शक्यतो पाणी पिवू नये. अगदीच गरज भासल्यास घोटभर प्यावे. जेवण झाल्या झाल्या लगेच पाणी प्यायले तर वजन / स्थूलता वाढते. आयुर्वेदाप्रमाणे मधुर,अम्ल, लवण, स्निग्ध गुणांनी युक्त पचण्यास हलका आणि उष्ण आहार घेण्यास सांगितलं आहे. फक्त स्थूल व्यक्तींनी गोड पदार्थ म्हणजे साखर, दूध व दुधापासून बनलेले व कफकारक तत्सम पचण्यास जड पदार्थ अजिबात घेऊ नयेत. (उदा. पेढा बर्फी, पनीर, बासुंदी, दही, श्रीखंड गुलाबजाम, रसमलाई, रसगुल्ला इ )

२. भाज्या -

दुपारच्या जेवणामध्ये गव्हाचे फुलके किंवा ज्वारीची भाकरी सोबत दुधी, पडवळ, भेंडी, लालभोपळा, दोडका, कारले, हिरवे मूग अशा भाज्या खाव्यात. या भाज्यांमध्ये कांदा, आले, लसूण घालावा. सोबतच पुदिन्याची चटणी, काकडीची टोमॅटोची कोशिंबीर,लिंबाची फोड, मुगाच्या डाळीचे वरणं, तांदूळ भाजून केलेला भात, थोड्या प्रमाणात असे जेवण घ्यावे. यामध्ये खूप जास्त वजन असलेल्या व मधुमेह असलेल्या व्यक्तींनी भात वर्ज्य करावा. जर मधुमेह नसेल तर पोळी/ किंवा भात असे एक दिवसाआड बदल करावे.

diet
नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

३.दुपारचं जेवण -

दुपारच्या जेवणानंतर पातळसर ताक सैंधव मीठ व काळी मिरपूड घालून घ्यावे. रात्रीचे जेवण शक्यतो ७ ते ७.३० पर्यंत घ्यावे कारण सूर्यास्तानंतर पचनशक्ती अजूनच मंदावते. जेवणात फळभाज्यांचे सूप / सार घ्यावीत. संपूर्ण जेवण करू नये. शक्यतो दुधी भोपळ्याचे सूप घेतले तर खूप चांगल्या पद्धतीने वजन कमी होऊ लागते. अधेमधे भूक लागल्यास भाजक अन्न जसे साळीच्या लाह्या किंवा ज्वारीच्या लाह्या, राजगिरा लाही याचे सेवन करावे.

४. फळे -

संत्रे, मोसंबी, आवळा, डाळिंब अशा फळांचे सेवन करावे. दुपारचे जेवणे , रात्रीचे जेवण आणि जागरण न करता रात्री १०.३० ते ११ दरम्यान झोप घेणे असे नित्यनियमाने केल्यास शरीरामध्ये खूप चांगले बदल झालेले दिसतात.

(लेखिका डॉ.ज्योत्स्ना गोखले या पुण्यातील वेदिक्यूर हेल्थकेअर आणि वेलनेस येथे आयुर्वेद आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com