esakal | नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!
sakal

बोलून बातमी शोधा

नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

नोटीस पीरिअडमध्ये 'या' गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

ऑफिसमध्ये राजीनामा दिल्यानंतर अनेक जण नोटीस पीरिअडमध्ये notice period कामाकडे दुर्लक्ष करतात किंवा या वेळात नेमकं काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा असतो. खरं तर असं होणं सहाजिकच आहे. नवी कंपनी, तेथील कामाचं स्वरुप यांचे विचार सतत डोक्यात घोळत असतात. सोबतच तुम्ही राजीनामा दिलाय म्हटल्यावर ऑफिसमधील अनेक कर्मचाऱ्यांचं तुमच्यासोबत असलेलं वागणंदेखील अचानकपणे बदलून जातं. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर होत असतो. मात्र, अशा द्विधा मन:स्थितीत सगळ्याकडे दुर्लक्ष करुन तुम्ही तुमच्या कामावर फोकस करणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्या अवतीभोवती कितीही बदल झाले तरीदेखील कामाप्रती तुमची असलेली एकनिष्ठता कायम राखली पाहिजे. सोबतच नोटीस पीरिअड सुरु असताना नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. किंवा, या काळात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे आज जाणून घेऊयात. (lifestyle-career-and-money-things-to-do-during-notice-period)

हेही वाचा: सिलेंडर मॅनच्या नावामागचं कोडं उलगडलं

१. अपूर्ण कामे पूर्णत्वास न्या -

अनेकदा राजीनामा दिल्यानंतर लोक रिलॅक्स होऊ काम करु लागतात. आता मी काम केलं काय आणि नाही काय मला कोण विचारतंय? असा प्रश्न ते निर्माण करतात. मात्र, हा अॅटिट्युड अत्यंत चुकीचा आहे. कामाकडे दुर्लक्ष करण्याऐवजी राहिलेल्या दिवसात तुम्ही काय -काय करु शकता याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. एक लक्षात ठेवा तुम्ही राजीनामा जरी दिला असला तरीदेखील नोटीस पीरिअडमध्ये सुद्धा तुम्ही कंपनीचे कर्मचारी म्हणूनच काम करत असता. त्यामुळे या काळात शक्य होईल तितकी अन्य कर्मचाऱ्यांची मदत करा. उगाच कोणाला वायफळ लेक्चर देत बसू नका. तुम्हाला दिलेलं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करा. ज्यामुळे तुम्ही ऑफिस सोडल्यानंतर कोणीही तुम्हाला नंतर दोष देत बसणार नाही.

२. हॅण्डओव्हर करा -

प्रत्येक कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना ठराविक जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. त्यामुळे जर तुमच्यावर एखादी जबाबदारी असेल तर कंपनी सोडण्यापूर्वी तुमची जबाबदारी किंवा काम दुसऱ्यांकडे हॅण्डओव्हर करा. ज्यामुळे तुम्ही सोडून गेल्यानंतर कंपनीची किंवा कर्मचाऱ्यांची गैरसोय होणार नाही. अनेक जण काम हॅण्डओव्हर करतानादेखील काचकुच करतात. काम हॅण्डओव्हर करताना आपलं स्किल किंवा नॉलेज दुसऱ्यासोबत शेअर करावं लागेल असा संकुचित विचार मनात ठेवतात. परंतु, एक लक्षात घ्या ज्ञान वाटल्याने ज्ञानात भर पडत असते.

३. ऑफिस लॅपटॉपमधून पर्सनल डेटा डिलीट करा -

अनेक जण ऑफिसच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये काही पर्सनल डॉक्युमेंट्स, फोटो किंवा अन्य महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह करुन ठेवत असतात. त्यामुळे ऑफिस सोडण्यापूर्वी तुमचा महत्त्वाचा डेटा डिलीट करायला विसरु नका. आधी तुमच्या महत्त्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या आणि नंतर तो डिलीट करा.

४. भेदभाव होत असेल तर संवाद साधा -

अनेकदा एखादा कर्मचारी ऑफिस सोडून जाणार असल्याच समजताच अन्य कर्मचाऱ्यांचं त्याच्याप्रतीचं वर्तन बदलतं. मित्र म्हणून वावरणारेच अनेकदा टोमणे मारण्यास सुरुवात करतात किंवा बोलणं कमी करणे, गैरसमज पसरवणं या सारख्या गोष्टी करतात. त्यामुळे अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करा. पण जर हे प्रमाण वाढत असेल तर संबंधित व्यक्तीशी थेट संवाद साधा आणि निर्माण झालेले गैरसमज दूर करा.

५. आभार माना-

ऑफिसमध्ये काम करत असताना चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे सहकारी आपल्याला मिळत असतात. त्यामुळे या दोन्ही सहकाऱ्यांचे आवर्जुन आभार माना. काही जण पावलोपावली आपली मदत करत असतात, मानसिक आधार देत असतात, आपल्याला समजून घेत असतात त्यामुळे अशा सहकाऱ्यांचे नक्कीच आभार माना. तसंच जे सहकारी सतत तुमच्यावर टीका करत होते, कमीपणा दाखवत होते त्यांचेही आभार माना. कारण, त्यांच्या याच वर्तनामुळे आयुष्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यास तुम्ही तयार झालात.

loading image