सेलिब्रिटी वीकएण्ड : ‘भरपूर वाचन, स्वयंपाक अन् आराम’

पियूष रानडे, अभिनेता
Friday, 25 September 2020

आठवडाभर काम केल्यावर ज्या दिवशी सुट्टी असते तो पूर्ण दिवस हा माझा असतो. सुट्टीचा दिवस आहे म्हणून उशिरा उठणं मला आवडत नाही. त्या दिवशीसुद्धा मी रोज जसं लवकर उठतो तसाच उठतो. मी ‘फिटनेस फ्रीक’ आहे त्यामुळे त्यानंतर जिम किंवा घरीच तासभर व्यायाम करणं हे माझं रोजचं ठरलेलं रूटिन असतं.

आठवडाभर काम केल्यावर ज्या दिवशी सुट्टी असते तो पूर्ण दिवस हा माझा असतो. सुट्टीचा दिवस आहे म्हणून उशिरा उठणं मला आवडत नाही. त्या दिवशीसुद्धा मी रोज जसं लवकर उठतो तसाच उठतो. मी ‘फिटनेस फ्रीक’ आहे त्यामुळे त्यानंतर जिम किंवा घरीच तासभर व्यायाम करणं हे माझं रोजचं ठरलेलं रूटिन असतं. ते झाल्यावर छान पोटभर नाश्ता करून मग आपल्याला हवा तसा दिवस घालवायचा. मला वाचन करायला भरपूर आवडतं. त्यामुळे ज्या दिवशी मी घरी असतो, तेव्हा माझा जास्त वेळ हा वाचन करण्यात जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला ऐतिहासिक, पौराणिक अशा अनेक प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात. मग त्या व्यतिरिक्त त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी मी आवर्जून अशी एखादी कलाकृती किंवा चित्रपट पाहतो. तसा काही अर्थ नसणारा, आपल्या मेंदूला आराम देणारा, रिलॅक्स करणारा चित्रपट. यासाठी मी कॉमेडी फिल्म्सना प्राधान्य देतो. तसंच मी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे भाग बघतो. त्याचप्रमाणे मी क्रिकेटचे जुने सामने बघतो. त्याने मूड एकदम फ्रेश होतो. सुट्टीच्या दिवशी मी शक्य होईल तितका फोनचा वापर टाळतो; अगदीच सिरीज किंवा काही पाहायचं असेल, तर मी फोनचा वापर करतो. त्या दिवशी मी सोशल मीडियावर ऑनलाईन येणं टाळतो, तसंच फोनवरसुद्धा अगदी गरज असेल तरच बोलतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला जवळजवळ सगळेच पदार्थ उत्तम बनवता येतात, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मी तेही करतो. मला संगीताची प्रचंड आवड आहे. आमच्या घरी संगीताची परंपरा आहे. माझे आजोबा व्हायोलिन वाजवायचे, माझे बाबा व्हायोलिन आणि सतार वाजवतात, कुटुंबातले काही जण गातात. त्यांच्याकडेच मीही गाणं शिकलो. रोज मी बघावं तेव्हा काही ना काही गात असतो, गुणगुणत असतो. सुट्टीच्या दिवशी मी पूर्ण वेळ घरीच असतो. तसं असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरायला जाणं, मित्र-मैत्रिणींना भेटणं हे मी करत नाही. त्या दिवशी मला घरी राहायला खूप आवडतं. कारण मला असं वाटतं, की जर तुम्ही आठवड्यातले पाच-सहा दिवस काम करत आहात, तर एक दिवस तरी तुमच्या शरीराला आणि मनाला तुम्ही सगळ्यातूनच आराम दिला पाहिजे; त्यामुळे तुम्ही बाकीचे दिवस छान फ्रेश राहू शकता. अशा प्रकारे सगळा दिवस घालवल्यावर दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा एकदा काम करायला मी अगदी आनंदाने तयार असतो.
(शब्दांकन : राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrity Weekend Piyush Ranade