पीडित, वंचितांच्या ‘उत्कर्षा’साठी...

चैतन्य महिला मंडळाची सुरुवात १९९४ मध्ये झाली. आम्ही राहत होतो तिथलं वातावरण मुलांसाठी पोषक नव्हतं.
chaitnya mahila mandal
chaitnya mahila mandalsakal

- ज्योती पठानिया, संस्थापिका, चैतन्य महिला मंडळ

चैतन्य महिला मंडळाची सुरुवात १९९४ मध्ये झाली. आम्ही राहत होतो तिथलं वातावरण मुलांसाठी पोषक नव्हतं. त्यावेळी लक्षात आलं, की, बाहेर अशी अनेक मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? आजूबाजूचा परिसर आपण बदलू शकत नाही; पण आपण स्वतःला तर बदलू शकतोच. त्याचबरोबर तिथं बऱ्याच महिला होत्या त्यांनाही मदतीची गरज आहे हेही लक्षात आलं.

त्यांच्याशी बोलल्यावर समजलं, की महिलांच्याही बऱ्याच अडचणी होत्या, त्यांनादेखील आपण मदत करू शकतो, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांची प्रगती व्हावी, त्याचबरोबर येथील महिलांना अनेक संधी मिळाव्यात, त्यांच्या जीवनात बदल व्हावा या उद्देशानं याची सुरुवात झाली.

आम्ही १९९४ मध्ये ग्रुप रजिस्टर केला आणि कामाला सुरुवात केली. सुरवातीला विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जात होते; तसंच विविध उपक्रम राबवले जात होते. सध्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात काम चालते. ग्रुपची सुरुवात करताना आम्ही १३५ महिला एकत्रित होतो. सध्या सोशल मीडियामुळे एवढा विस्तार वाढला आहे, की जिल्ह्यातून सगळीकडून महिला संपर्क साधत असतात. आत्तापर्यंत जवळजवळ एक लाखाच्या आसपास महिला चैतन्य महिला मंडळाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत.

सुरूवातीला महिलांसाठी ‘कुटुंब सखी’ नावानं समुपदेशन सुरू झालं. यामध्ये त्यांना काही अडचणी असतील, मदत हवी असेल, काही बोलायचं असेल किंवा फक्त व्यक्त व्हायचं असेल, तर त्या इथे येऊन व्यक्त होत होत्या. यातून असं लक्षात आलं, की महिला खूपच अडचणीत असतात. काही महिलांना घर सुटलं, तर राहण्याचं ठिकाणही मिळत नाही,. बाहेरचे लोक त्रास देत असतात, सासरचा त्रास असतोच, काही वेळा तर घरातूनच त्रास असतो.

नवऱ्याला काही गोष्टी सांगू शकत नाहीत. अशा महिलांसाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘निवास व्यवस्था’ सुरू केली. समुपदेशन सुरू होतं, त्यावेळी लक्षात आलं ज्या महिला पीडित असतात त्या फक्त लैंगिक शोषणालाच बळी पडलेल्या आहेत असं नाही तर इतर किती तरी समस्या असतात. त्या स्त्रीला टार्गेट केलं जातं. मात्र, यामध्ये तिचा दोष काहीच नसतो.

आम्ही अशा पीडित महिलांसाठी काम करू लागलो. आम्ही २००२ मध्ये त्यांच्यासाठी ‘आश्रय’ निवास व्यवस्थेची स्थापना केली. देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करत असताना लक्षात आलं, की तिथल्या लहान मुलांची परिस्थिती खूपच बिकट आहे. म्हणून २००५ मध्ये बुधवार पेठेतल्या वस्तीत राहणाऱ्या लहान मुलांसाठी ‘उत्कर्ष प्रकल्प’ या नावानं रात्रीचं पाळणाघर सुरू केलं. त्यावेळी आम्ही काही शासकीय योजनांचा आधार घेतला.

त्यावेळी ‘राजीव गांधी पाळणाघर योजना’ सुरू होती. यामध्ये सुरवातीला स्वतःहून पैसे घातले, समाजामधूनही मिळाले. लोकांना काम दिसत होतं. बरेच लोक येऊन स्वतः मदत करण्यासाठी विचारत होते. यातून एक गोष्ट लक्षात आली, की आपल्याला समाजासाठी काही करायचं असेल, तर त्यासाठी पैशांचं आवाहन करावं लागत नाही. ती गरज आपोआप भागली जाते. हे सगळं होत गेलं.

‘उत्कर्ष प्रकल्प’च्या माध्यमातून दरवर्षी ५० मुलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. त्या लहान मुलांमधील चांगला बदल आईच्या लक्षात आला, की आम्ही त्या बालकाला बालकल्याण समितीसमोर नेऊन त्याच्या पुढील शिक्षणाची, राहण्याची सोय करतो, बालसुधारगृह किंवा पुढे चांगलं शिक्षण घेता येईल यासाठी प्रयत्न करतो.

पीडित महिलांसाठी ‘आश्रय’ निवासव्यवस्था सुरू झाली आणि २००४ मध्ये ‘उत्कर्ष प्रकल्प’ सुरू झाला. आश्रय सुरू झाल्यानंतर हे लक्षात आलं की, सर्वांत जास्त वाईट परिस्थिती कोणाची आहे, तर समाजात लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या व बाजारी लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या महिलांची. त्यांच्याबरोबरच त्या वातावरणात वाढणाऱ्या लहान मुलांचं काय? त्यांचा त्यात काय दोष? ही मुलं तिथेच राहिली तर गुन्हेगारीच वाढेल.

त्यांना चांगलं जीवन जगण्याचा हक्क आहे. यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत आणि करत राहणार आहोत. बाजारी लैंगिक शोषणाला ज्या महिला बळी पडलेल्या आहेत, त्यांना तिथून बाहेर पडण्यासाठी आम्ही त्यांना हवी ती मदत करतो. त्यांच्या राहण्याची व्यवस्था करतो, त्यांना विविध प्रकारचं प्रशिक्षण देतो. त्यामुळे ज्या स्त्रियांच्या आयुष्यात अंधार आलेला आहे त्यांना एक आशेचा किरण देण्याचं आम्ही काम चैतन्य महिला मंडळाच्या माध्यमातून करत आहोत.

(शब्दांकन : प्रियांका सत्यवान)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com